पालघर : रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे केळवे रोड व सफाळे परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या दोन मातांची सुखरूप प्रसुती झाल्याची माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी दाखवलेली समयसूचकता तसेच आशाताई व ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.
सोमवारी (ता. ६) पहाटेपासून केळवे रोड व सफाळे परिसर जलमय झाला होता. दोन्ही ठिकाणी चार ते सहा फूट पुराचे पाणी साचले होते व त्यामुळे त्या ठिकाणाहून रुग्णवाहिका किंवा इतर वाहन जाण्याची शक्यता नव्हती.
मायखोप येथील एका महिलेला सकाळी अचानक प्रसुती कळा जाणवू लागल्या. त्यावेळी तिच्या घरात तीन फूट पाणी होते. आशा सेविका व ग्रामस्थांच्या मदतीने एका जुन्या लाकडी दरवाजाला हंगामी स्ट्रेचरचे रूप देऊन ग्रामस्थांनी मदतीने तिला तातडीने मायखोप येथील उपकेंद्रामध्ये हलविले. प्रसूती दरम्यान केलेल्या तिच्या अखेरच्या सोनोग्राफीमध्ये तिच्या प्रसूतीची संभाव्य तारीख ही १५ दिवस पुढे असल्याने तसेच केळवे रोड परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी अपेक्षा नसल्याने आरोग्य यंत्रणेने तिला आरोग्य संस्थेच्या जवळ सुरक्षित ठिकाणी हलवले नव्हते असे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान पावसाचा रुद्र अवतार वाढल्याने तसेच प्रसूती दरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाल्यास या गर्भवती महिलेला इतरत्र हलवण्यास त्रास होईल हे लक्षात घेऊन उपकेंद्रातील परिचारिकांनी या महिलेला सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हलविले. त्याचवेळी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणखी एका गुंतागुंतीची प्रसुत महिला दाखल झाली होती. या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी सानप यांनी समयसूचकता दाखवत गुंतागुंतीच्या प्रसूत महिलेला संदर्भीय सेवेसाठी नोंदणी असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सायंकाळी दोन्ही प्रसूती व्यवस्थित संपन्न होऊन माता व बालक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली आहे.
सफाळे येथील पूरजन्य परिस्थितीच्या प्रसंगी याच प्राथमिक आरोग्य केंद्रात चार सर्पदंशाचे रुग्ण दाखल झाले होते. कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या सहकार्याने कार्यक्षमता व तत्पर उपचार देऊन कठीण प्रसंग उत्तमरित्या हाताळल्याने आरोग्य विभागाने त्यांचे कौतुक केले आहे.
मुसळधार पावसात ९६ प्रसूत
जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्याशी संलग्न उपकेंद्रांमध्ये ६ जुलै रोजी ५२ तर ७ जुलै रोजी ४४ प्रसुती झाल्या. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत या आरोग्य केंद्रांनी ६५ सर्पदंशाचे रुग्ण हाताळल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
