पालघर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून पूरसदृश्य परिस्थितीमुळे गेल्या २४ तासात तीन तर यंदाच्या पावसाळ्यात १० व्यक्ती मयत झाली असून जिल्ह्यातील सध्याची पूर परिस्थिती गंभीर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रतिपादन केले. या परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच विविध विभागाशी समन्वय ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अहोरात्र पाळी – पाळीने काम करीत असून पुरामुळे बाधित कुटुंबियांसाठी मदत व पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

शुक्रवार पासून (ता ३) जिल्ह्यात पावसाने कहर केला असून यामुळे १० व्यक्ती मयत झाले असून एक व्यक्ती बेपत्ता आहे. मुसळधार पावसामुळे दोन पक्क्या घरांचे पूर्णतः नुकसान तर ७३ घरांचे अंशतः नुकसान झाले असून चार कच्ची घरे पडली आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व राज्य आपत्ती निवारण दलाची प्रत्येकी एक तुकडी कार्यरत असून या पुरामध्ये सात म्हैस, दोन बैल व ८९८५ कोंबड्या मृत पावल्या आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू असली तरीही या मार्गावर पाणी साचणाऱ्या दोन- तीन ठिकाणी आवश्यक उपाययोजना आखण्यात येत आहेत. अनेक अंतर्गत रस्त्यांवर पावसाचे पाणी आल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने या मार्गांवरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नमूद केले.

पालघर, वसई व वाडा तालुक्यातील ३८९ कुटुंबातील १२६१ नागरिकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्यावेळी जीवित हानी होणार नाही यासाठी प्राधान्य दिले जात असून बाधित कुटुंबांसाठी मदत व पुनर्वसन करण्यावर भर दिला जात आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर बाधितांचे नुकसान भरपाई संदर्भात पंचनामे केले जाणार असून त्यांच्या मदतीकरिता राज्य सरकारकडून विशेष मदत मागितली जाईल. अति आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच धरण, धबधबे, नदी, नाले, ओहळ, तलाव व समुद्र किनारे येथे जाण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिले आहे.

धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची अनुमती घेणार

जिल्ह्यामधून वाहणारी पिंजाळ नदीने इशारा पातळी गाठली असून सूर्या, वैतरणा, देहर्जे नद्यांची पातळी इशारा पातळी पेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील कवडास धरणांमधून ७२१५० क्यूसेक विसर्ग सुरु असून धामणी (४० टक्के), तानसा (४३ टक्के), मोडकसागर (५२ टक्के) व मध्य वैतरणा (२६ टक्के) या धरणांमधील पातळी तुलनात्मक कमी आहेत. धरणांमधून कोणत्याही स्वरूपात पाणी सोडण्यात येणार असल्यास संबंधित सर्व विभागांशी तसेच नदीकिनारी राहणाऱ्या गावांना सतर्क करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांना पूर्वसूचना देणे व त्यांची अनुमती घेणे अनिवार्य करण्यात आल्याचे असल्याचे या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. धारणांमधील पाण्याच्या पातळीवर पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा प्रशासन देखरेख ठेवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

भुयारी मार्गांकरिता पंप कार्यरत

पश्चिम रेल्वे तसेच डीएफसीसी मार्गावर असणाऱ्या भुयारी मार्गांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी सक्शन पंप बसवण्यात आले असून ते अधिक कार्यक्षम पद्धतीने कार्यरत ठेवण्यासाठी रेल्वे व डीएफसीसी व्यवस्थापनाशी चर्चा करून आखणी करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

झांझरोळी बंधाऱ्याचे मजबुतीकरण

माहीम केळवे लघु पाटबंधारे योजने अंतर्गत केळवे रोड जवळ असणाऱ्या झांझरोळी बंधाऱ्या मध्ये ३.२४२ दशलक्ष घनमीटर इतके १०० टक्के पाणी भरले असून या धरणातून २९५१ क्यूसेक मिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या भिंतीचा काही भाग खचून गेला असून पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तांत्रिक या बंधाऱ्याची पाहणी करत आहे. या बंधाऱ्याचा “पिचिंग वॉल” बाधित झाली असून बंधाऱ्याला धोका नसल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने प्रशासनाला कळविले आहे. या बंधाऱ्याच्या लगत असणाऱ्या चार पाड्यांमधील एक हजार नागरिकांची स्थलांतर करण्यात आले असून बंधाऱ्याच्या बाधित भिंतीच्या मजबुती करण्यासाठी वाळू भरलेल्या गोणी व आवश्यक यंत्रसामुग्री मार्फत काम सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. झांजरोळी बंधारा तसेच इतर बंधाऱ्यावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खेकडे व्यवस्थापन उपाययोजना राबविल्या गेल्या का ? याची आपण चौकशी करणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

शिक्षकांनी आपत्कालीन सुट्टीच्या वेळी शाळेत उपस्थित रहाणे अपेक्षित – जिल्हाधिकारी

अतिवृष्टी अथवा मुसळधार पावसा संदर्भात पूर्वसूचना मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी बाबत सूचना दिल्या जात आहेत. ही सुट्टी फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असून अशा आपत्कालीन प्रसंगी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केले

जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेत सरकारी कर्मचाऱ्यां इतकीच महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर असून बचाव कार्यात तसेच पुनर्वसन करण्याच्या ठिकाणी अनेकदा जवळच्या शाळेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे तसेच आवश्यकतेनुसार मदत कार्यात सहभागी होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जे शिक्षक मुख्यालय राहत नसतील त्यांच्याविरुद्ध देखील चौकशी करून आगामी काळात कारवाई करण्याची असे सुचित करण्यात आले.