पालघर : पालघर जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून कालच्या दिवसभरात ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असून सद्यस्थितीत या हंगामात १२२ टक्के पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे तालुका जलमय झाला असून मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते व पुलावर पावसाचे पाणी वाहत असल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. विरार पलीकडच्या रेल्वे उपनगरीय क्षेत्रात देखील विविध ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे अडथळा निर्माण झाला असून पश्चिम रेल्वे देखील विस्कळीत झाली आहे.

आज सकाळी संपलेल्या २४ तासात पालघर तालुक्यात १३४ मिलिमीटर, वसई तालुक्यात १२३ मिलिमीटर, वाडा तालुक्यात १०९ मिलिमीटर तर डहाणू तालुक्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर रात्रभर सुरू असून दिवसादेखील संततधार सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मनोर मस्तान नाका, विक्रमगड फाटा, वरई फाटा या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून इतर ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. पालघर मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात झाड उमळुन पडल्याने सकाळपासून वाहतूक खंडित राहिली होती. सूर्या नदी भरभरून वाहत असल्याने नदी किनाऱ्याच्या भागात नदीच्या पात्राची पाण्याची पातळी वाढली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते व पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक खंडित झाली आहे.

विरार – जलसार रोरो सेवेकडे जाणाऱ्या जलसार – टेंभीखोडावे रस्त्यावर देखील पाणी साचले असून केळवे रोड माकुणसार या ठिकाणी देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पालघर शहरात अनेक ठिकाणी खोलगट भागात पाणी साचले असून आदर्श नगर , खानपाडा व पूर्वेकडील भागाचा समावेश आहे.

समर्पित मालवाहू रेल्वे मार्गीके वरून पश्चिम रेल्वे कडे येणाऱ्या एका मालगाडी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उपनगरीय सेवा विस्कळीत झाली आहे. तर पालघर यांना मध्ये पाणी साचू लागल्याने रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर केळवे रोड येथील रेल्वे पुलालगत पाणी वाहत असल्याने धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पालघर, वाडा, विक्रमगड व वसई तालुक्याच्या तुलनेत डहाणू, तलासरी, जव्हार व मोखाडा भागात पावसाचा जोर तुलनात्मक कमी असल्याचे दिसून आले आहे.

सावधानतेचा इशारा

पालघर जिल्ह्यासाठी उद्या देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला असून दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान समुद्राला भरती असल्याने याप्रसंगी विविध समुद्रकिनारी खोलगट ठिकाणी पाणी साचण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून शासकीय कर्मचारी व अधिकारी पूरग्रस्त ठिकाणी भेट देऊन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.