पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात केळवे रोड व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कच्च्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे दैनंदिन अधिवास व खानपानासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केळवे रोड व लगत असणाऱ्या मायखोप, रोठे, धावांगे पाडा, टोकराळे, मोरीपाडा, भूतारमान, मोहपाडा, झाझरोळी  तसेच पूर्वेकडील देवीचा पाडा, बंदाठे इत्यादी भागांमध्ये पुराचे पाणी तीन ते चार फुटांपर्यंत पोहोचले होते. तसेच कमारे, वाकसई या गावांना देखील याचा त्रास सहन करावा लागला असून याभागात बिकट परिस्थितीत निर्माण झाली होती. त्यामुळे कच्च्या घरांमधील तळ चिखलमय झाला असून अनेक ठिकाणी अन्नधान्य पदार्थ देखील पावसात भिजले आहेत.

केळवे रोड पश्चिमेच्या भागात सागराप्रमाणे पाण्याचे साम्राज्य साचल्याने नागरिकांना दळणवळण करणे तसेच मदत पोहोचण्यास अनेक अडचणीचा सामोरे जावे लागले. केळव्याचे सरपंच संदीप किनी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून धावंगे पाडा येथील प्राथमिक शाळेत मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारले असून २५० ते ३५० नागरिकांना तयार शिजवलेले अन्न पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.

काही घरांमधील जीवनोपयोगी वस्तू, कपडे, बिछाने पावसामध्ये भिजल्याने अनेक कुटुंबांना झोपण्यासाठी पर्याय नाही. काही कुटुंबांनी घाई गडबडीत सिमेंट रेतीचा थर जमिनीवर अंथरून हंगामी व्यवस्था केली असली तरीही आपल्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता आपण या परिसरात लवकरच भेट देणार असून प्रत्येक बाधित कुटुंबाला अन्नधान्य पॅकेट तसेच मध्यवर्ती स्वयंपाक गृहाला मदत करण्याचे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले. पाऊस संपल्यानंतर या परिसरातील बाधित कुटुंबांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार असून महसूल अधिकारी कर्मचारी मदत कार्यासाठी तत्परतेने प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले.

मुख्य रस्त्याची दुरावस्था

सततच्या पावसामुळे पालघर शहरासह केळवे रोड परिसरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी कॉंक्रिटचा थर वाहून गेला असून अनेक रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. काही रस्ते नुकतेच बनविण्यात आले असले तरी अनेक काँक्रेटच्या रस्त्यांवर भेगा पद्य आहेत.

वीज पुरवठा खंडित

मुसळधार पाऊस व वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खांब व विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. यामुळे अनेक गावांमध्ये १५ ते २० तास वीजपुरवठा खंडित होता. तर काही भागात इंटरनेट सेवा देखील बंद होती. पावसाचा जोर ओसरला नंतर महावितरण कर्मचाऱ्यांकडून विद्युत खांब पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाण्याचा निचरा होण्यास मर्यादित जागा

अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले अरुंद केल्याने तर काही ठिकाणी नाल्याच्या भागात अतिक्रमण केल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मर्यादा आल्याने पाणी गाव पाड्यांमध्ये शिरण्याचे प्रकार घडले आहेत.