पालघर: पालघर जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. १ जुलैच्या सकाळपासून २ जुलैच्या सकाळपर्यंत अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाचे आगमन काहीसे उशिरा झाले होते. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली असली, तरी महिन्याच्या अंतिम टप्प्यात पावसाने जोर धरला. जूनअखेरीस जिल्ह्यात ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या पावसाने ही आकडेवारी वेगाने वाढवली असून, आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २०३.४ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
डहाणूत पावसाचा सर्वाधिक जोर
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी डहाणू तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर दिसून आला. १ जुलै रोजी डहाणूमध्ये १६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर तलासरी (१२५.८ मिमी), पालघर (११९.८ मिमी), विक्रमगड (११०.८ मिमी), वसई (९९.३ मिमी) आणि वाडा (९०.३ मिमी) या तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. तुलनेने जव्हार (६०.५ मिमी) आणि मोखाडा (५१.९ मिमी) या तालुक्यांत पावसाचा जोर काहीसा कमी राहिला.
वीजपुरवठा खंडित, जनजीवन प्रभावित
जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. विशेषतः विक्रमगड, जव्हार, मोखाडा आणि वाडा या तालुक्यांत वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. काही ठिकाणी विद्युत खांब कोसळणे किंवा तारा तुटून पडण्याचे प्रकार घडल्याने ग्रामीण भागातील अंधाराचे साम्राज्य वाढले होते. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला असून, पुलांखालील पाणी साचल्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता. खबरदारी म्हणून काही भागांत विद्युत प्रवाह देखील खंडित करण्यात आला होता.
शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी जिल्ह्यातील बळीराजा मात्र सुखावला आहे. भात शेती आणि पेरणीच्या कामांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक असल्याने शेतकरी बांधवांची शेतात लगबग सुरू झाली आहे. पावसाने जोर धरल्यामुळे आता खरीप हंगामातील कामांना गती मिळणार आहे.
पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पुढील पाच दिवस जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन जीवितहानीच्या घटना तर एक बेपत्ता
एक जुलै रोजी दिवसभर सुरू असलेल्या पावसात मौजे चहाडे तालुका पालघर येथील चंदर किसन वरठा वय 28 रात्री मासेमारी साठी गेले होते. त्यांचे प्रेत मौजे चहाडे धानविपाडा येथील नाल्यामध्ये आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आढळून आले आहे. तसेच पालघर हद्दीतील आगरी पाडा येथे राहणाऱ्या राबिया शब्बीर सय्यद या 47 वर्षीय महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळून मृत्यू झाला. मौजे पेठ (केदारपाडा) येथील विठ्ठल जान्या केदार (55), हे एक जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास सुर्या नदीवर मासेमारी करण्यासाठी गेले होते परंतु अद्यापपर्यंत घरी परतलेले नाहीत, नदीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे. डहाणू येथील निकणे पुलावरील सिमेंटचा थर वाहून गेला आहे.
तीन जीवितहानीच्या घटना
एक जुलै रोजी दिवसभर सुरू असलेल्या पावसात चहाडे गावाजवळ नाल्यात मासेमारीसाठी गेलेल्या चंदन वरठा या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. तसेच येथे राहणाऱ्या राबिया शब्बीर सय्यद या ४७ वर्षीय महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळून मृत्यू झाला. तसेच सूर्या नदीच्या पात्रात डहाणू येथील एका पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डहाणू येथील निकणे पुलावरील सिमेंटचा थर वाहून गेला आहे.
तालुका – १ जुलै – आतापर्यंत एकूण
वसई – ९९.३ – १६२
वाडा – ९०.३ – २९२.५
डहाणू – १५९ – २८८.४
पालघर – ११९.८ – २०७.४
जव्हार – ६०.५ – १४३.५
मोखाडा – ५१.९ – १२६.४
तलासरी – १२५.८ – ३१४.६
विक्रमगड – ११०.८ – २६९.६
एकूण – ११२ – २०३.४
