पालघर : २८ जूनपासून पालघर जिल्ह्यात पावसाच्या मुसळधार सरी सुरू असून ३ जुलैच्या दुपारपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांकरिता अतिजोरदार पावसाचा इशारा दिला असून उद्या व परवा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. ३० जूननंतर पावसाच्या तीव्रतेत मोठी वाढ झाल्याने, जिल्ह्यात पावसाची आकडेवारी वेगाने वाढत आहे. ३० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. ३० जून ते १ जुलै या कालावधीत ११६ मिलिमीटर, १ जुलै ते २ जुलैच्या सकाळपर्यंत ११२ मिलिमीटर, तर २ जुलै ते ३ जुलैच्या सकाळपर्यंत ८८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अशा प्रकारे, ३० जूनच्या आकडेवारीच्या तुलनेत ३ जुलैच्या दुपारपर्यंत ही सरासरी ३१६ मिलिमीटरवर पोहोचली आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यासाठी यापूर्वीही २ जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला होता. आता ४ आणि ५ जुलै रोजी पुन्हा एकदा ‘रेड अलर्ट’ देण्यात आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे अशा समस्या उद्भवत आहेत. नदीपात्रातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले तरी, जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे. भात शेती आणि पेरणीच्या कामांसाठी हा पाऊस अत्यंत पोषक ठरत असल्याने ग्रामीण भागात शेतीची लगबग वाढली आहे. पावसाच्या या दमदार हजेरीमुळे खरीप हंगामातील कामांना मोठी गती मिळाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीनाले आणि सखल भागांकडे न जाण्याच्या सूचना दिल्या असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.