पालघर : पालघर जिल्ह्यात सलग सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना आठवड्याभरात पाचव्यांदा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात सरासरी ५२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वसई व पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती कायम राहिली आहे. जुलै महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केली. १ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे २ जुलै रोजी शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार (ता ३) रोजी झालेल्या पावसामुळे व हवामान विभागाने दर्शविलेल्या रेड अलर्ट मुळे ४ जुलैपासून सलग सुट्ट्या सुरू आहेत.
पालघर जिल्ह्यासाठी उद्या हवामान विभागाने येल्लो अलर्ट जाहीर केला असला तरी पश्चिम रेल्वेची सेवा अजूनही विस्कळीत आहे. शिवाय वसई व पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पर्जन्य परिस्थितीमुळे खोलगट भागांमध्ये पावसाचे पाणी घरामध्ये शिरले आहे.
आज दिवसभरात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पालघर – बोईसर, पालघर – मनोर, सफाळे – तांदूळवाडी या प्रमुख मार्गांवर तसेच जिल्ह्यात अनेक अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पुराच्या पाण्यामुळे खंडित झाली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उद्या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक आस्थापनांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
गिरीश महाजन यांनी घेतला आढावा; पूरग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची प्राथमिकता
राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पालघर जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. गिरीश महाजन यांनी मनोर येथे पालघर जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. झांझरोळी बंधाऱ्याची भिंत खचल्यामुळे निर्माण झाल्या धोका, पालघर, सफाळे आणि मनोर परिसरात निर्माण झालेली पूर परिस्थिती, पावसामुळे झालेली जीवितहानी आणि घरांचे नुकसान, जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेले आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्य याबाबत जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी महाजन यांना विस्तृत माहिती दिली. महाजन यांनी अधिकाऱ्यांसोबत पालघर मनोर रस्त्यावरील कोळसा पूल, मासवण येथील पूरस्थितीची पाहणी केली.
आपत्ती व्यवस्थापन खाते आपल्याकडेच असल्याने नुकसानग्रस्तांना तातडीने कशी मदत देता येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार असल्याचं महाजन यांनी सांगितले . नुकसानग्रस्तांना मदतीसाठी फार काळ ताटकळत न ठेवता त्यांना तातडीने मदत कशी दिली जाईल यासाठी प्रयत्न करणार असून अटी शर्ती मध्ये अडकून न राहता आपत्तीत नुकसान झालेल्यांना मदत कशी देता येईल याला प्राथमिकता देणार असल्याचे गिरीश महाजन यांनी माध्यमांना सांगितले. या बैठकीला पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख उपस्थित होते.
