पालघर: पालघर जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. कोसबाड, मनोर, वाडा आणि आसपासच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर विजेचे खांब कोसळले. या आपत्तीत घरांची छप्परे उडून भिंतींची पडझड झाली आहे.

कोसबाड परिसरात रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे काचरपाडा, लाखातपाडा, गवळीपाडा, असालीपाडा, चौधरीपाडा, म्हसेपाडा, नवी दापचारी आणि ब्राह्मणपाडा या भागात प्रचंड पडझड झाली. महाकाय चिंच, आंबा व जांभळाची झाडे घरांवर कोसळल्याने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील धान्य, कपडे आणि विद्यार्थ्यांची दप्तरे भिजून नुकसान झाले आहे.

या घटनेत घराची पडझड झाल्यामुळे कुमार हार्दिक वसंत पवार आणि आराध्या अजय पवार हे दोन शाळकरी विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अनेक ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

मनोर आणि वाडा तालुक्यात झाडे कोसळली

वाडा तालुक्यातील खरीवली तर्फे कोहोज येथील शेतकरी प्रफुल्ल यादव अधिकारी यांच्या घरावर ताडाचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. मनोर येथे वादळामुळे विद्युत वाहिनी झाडावर तुटून पडल्याने झाडाने पेट घेतला, तर अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पालघर शहराच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला, तर पूर्व भागात फक्त थंड वारे वाहिले.

शासकीय मदतीची आणि पंचनाम्याची मागणी

अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित कुटुंबांसमोर निवार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबांना लवकरात लवकर शासकीय आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.