पालघर : पालघर तालुक्यात काल सायंकाळपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून कालच्या दिवसभरात ९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र पालघर शहरात तब्बल ३०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असून सद्यस्थितीत या हंगामात १२२ टक्के पाऊस नोंदवण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे तालुका दुपार पर्यंत जलमय झाला होता. मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग, अनेक अंतर्गत रस्ते व पुलावर पावसाचे पाणी वाहत असल्याने जनजीवन ठप्प झाले होते.

केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ गुजरात कडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन बंद पडले होते. त्यामुळे डाऊन दिशेच्या सेवा काही काळ बंद राहिल्या होत्या. तसेच पालघर रेल्वे स्थानक व यार्डात पावसाचे पाणी साचल्याने गाड्या दुपारच्या वेळेत धिम्या गतीने प्रवास करीत होत्या. यामुळे विरार पलीकडची पश्चिम रेल्वे ची सेवा विस्कळीत राहिली. तर केळवे रोड येथील रेल्वे पुलालगत पाणी वाहत असल्याने धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वाढल्याने रेल्वे यंत्रणा सतर्क राहिली होती.

आज सकाळी संपलेल्या २४ तासात पालघर तालुक्यात १३४ मिलिमीटर, वसई तालुक्यात १२३ मिलिमीटर, वाडा तालुक्यात १०९ मिलिमीटर तर डहाणू तालुक्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर रात्रभर सुरू असून दुपारपर्यंत संततधार सुरू राहिली.

आज पालघर, वाडा, विक्रमगड व वसई तालुक्याच्या तुलनेत डहाणू, तलासरी, जव्हार व मोखाडा भागात पावसाचा जोर तुलनात्मक कमी असल्याचे दिसून आले आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मनोर मस्तान नाका, विक्रमगड फाटा, वरई फाटा या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून इतर ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले आहे. पालघर मनोर रस्त्यावर वाघोबा घाटात झाड उमळुन पडल्याने सकाळपासून वाहतूक खंडित राहिली होती. सूर्या नदी भरभरून वाहत असल्याने नदी किनाऱ्याच्या भागात नदीच्या पात्राची पाण्याची पातळी वाढली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते व पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहतूक खंडित झाली आहे. विरार – जलसार रोरो सेवेकडे जाणाऱ्या जलसार – टेंभीखोडावे रस्त्यावर देखील पाणी साचले असून केळवे रोड माकुणसार या ठिकाणी देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच पणेरी ओहोळावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने पालघर – माहीम, केळवे दरम्यान संपर्क काही काळ बंद राहिला.

दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. पालघर तालुक्यात तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उमळून पडल्याचे प्रकार घडले. पडलेली झाडे तोडून काढण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था कार्यरत असल्याचे दिसून आले. तर अनेक खोलगट भागांमध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा काही काळ खंडित ठेवण्यात आला होता.

पालघर शहर जलमय

पालघर शहरात अनेक ठिकाणी खोलगट भागात पाणी साचले असून आदर्श नगर , खानपाडा व पूर्वेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये व प्रमुख रस्त्यांवर दोन ते अडीच फूट पाणी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. पालघर शहरात ३०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने शहरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची यंत्रणा कूचकामी ठरल्याचे या पहिल्या दमदार पावसात दिसून आले.

सावधानतेचा इशारा

पालघर जिल्ह्यासाठी उद्या (रविवार) आणि सोमवार साठी हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केले असून दुपारी तीन ते चार वाजल्याच्या दरम्यान समुद्राला भरती असल्याने याप्रसंगी विविध समुद्रकिनारी खोलगट ठिकाणी पाणी साचण्याची भिती वर्तवण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून शासकीय कर्मचारी व अधिकारी पूरग्रस्त ठिकाणी भेट देऊन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.