पालघर : दैनंदिन कामासाठी परिसरातील औद्योगिक वसाहती तसेच मुंबई तसेच गुजरातकडे जाणाऱ्या नोकर वर्गाला मुसळधार पावसाचा फटका बसला. अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद राहिली तर पालघर सफाळा व विरार पलीकडच्या रेल्वे स्थानकांवर पावसाचे पाणी साचल्याने रेल्वेसेवा देखील ठप्प झाल्याने अधिक तर कर्मचाऱ्यांना आज सक्तीची रजा घ्यावी लागली.
हवामान विभागाने रेड अलर्ट चा ईशारा दिला होता. पहाटेपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालघर रेल्वे स्थानकात सकाळच्या प्रकारात पाणी साचले होते. त्याचवेळी नालासोपारा येथील रुळांवरून पाणी वाहत असल्याने उपनगरीय सेवा व लांब पल्ल्यांच्या गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. सकाळच्या सत्रात निघालेल्या काही गाड्या विरार पर्यंत नेऊन अकाली समाप्त करण्यात आल्या व त्यापैकी काही गाड्या पुन्हा माघारी गुजरातच्या दिशेने फिरवण्यात आल्या.
दरम्यानच्या काळात सफाळे रेल्वे स्थानकात दीड फुटापेक्षा अधिक पाणी असल्याने रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. तर केळवे रोड रेल्वे स्थानकाला लागत असतात पुलाच्या लगत पुराचे पाणी वाहून जात असल्याने त्या ठिकाणी गाड्यांच्या गतीवर मर्यादा आणण्यात आली होती. सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्यानंतर व विरार पलीकडचे रुळांवरील ओसरल्याने व पुराच्या पाण्याची परिस्थिती सुधारल्यानंतर काही लांबल्याच्या गाड्या विरारच्या दिशेने पुढे पाठवण्यात आल्या.
पण काही वेळेतच विरार पलीकडची पूर परिस्थिती कायम राहिल्याने बहुतांश गाड्या विरार ते डहाणू रोड व पलीकडे उंबरगाव – वापी पर्यंतच्या स्थानकात थांवबून ठेवण्यात आले आहेत. अनेक उपनगरीय सेवा रद्द करण्यात आल्या तर लांब पाल्यांच्या गाड्या अकाली संभक्त केल्याने नागरिकांना रेल्वे स्थानकांवर प्रतीक्षेत उभे राहावे लागले. ज्या गाड्यांची अकाली समाप्ती करण्यात आली त्या ठिकाणी उतरलेल्या प्रवाशांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा व कोसळणाऱ्या पावसाचा सामना करावा लागला. सायंकाळपर्यंत पश्चिम रेल्वे वरील वाहतूक बहुतांशी ठप्प राहिल्याने नागरिकांना घरीच राहावे लागले.
