पालघर: पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवार – शनिवारी पावसाने थैमान घातल्यानंतर आज पहाटेपासून पुन्हा जिल्ह्याच्या सागरी तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. रेल्वे सह जिल्ह्यातील अंतर्गत मार्गांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचल्याने जनजीवन ठप्प राहिले तर पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. केळवे रोड (झांझरोळी) येथील बंधाऱ्याच्या संरक्षण भिंती चा भाग कोसळून पडल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपायोजना हाती घेतल्या आहेत.

रविवारी दिवसभरात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज पहाटेपासून मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात झाली. सकाळी १० वाजता संपलेल्या २४ तासात वसई तालुक्यात २०३ मिलिमीटर, वाडा तालुक्यात १८० मिलिमीटर, पालघर तालुक्यात १६५ मिलिमीटर, तर डहाणू तालुक्यात १०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघर शहरात काल सायंकाळ ५३० वाजल्यापासून च्या २४ तासात ३७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

विरार स्थानकाच्या पलीकडे नालासोपारा व सभोवतालच्या भागात पावसाचे पाणी रेल्वे रुळावर साचल्याने सकाळपासून धीम्या गतीने सुरू असलेली रेल्वे वाहतूक ७ वाजल्यानंतर ठप्प झाली. दुपारी अकरा वाजल्याच्या सुमारास तासभर काही लांबल्याच्या गाड्या मुंबईकडे पुढे पाठवण्यात आल्या. मात्र त्यानंतर वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबून ठेवण्यात आल्या होत्या. अनेक लांबल्यांच्या गाड्यांना विविध स्थानकात अकाली समाप्ती दिल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर उपनगरीय सेवा सायंकाळी उशिरापर्यंत देखील ठप्प राहिल्याने कर्मचारी व कामगार वर्गाला सक्तीची रजा घ्यावी लागली. तर बाहेर पडलेल्या प्रवाशांना वेगवेगळ्या स्थानकात घरी पोहोचण्याच्या प्रतीक्षेत थांबून राहावे लागले.

पालघर तालुक्यात पावसाचा अधिक प्रमाणात प्रभाव दिसून आला. पालघर शहरासह सफाळे व केळवे पूर्व – पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोकवस्तीमध्ये पाच ते सहा फूट पाणी शिरल्याच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जिल्ह्यातील अनेक अंतर्गत मार्गांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक बंद राहिली. वैतरणा, सूर्या, हात नदी व इतर नद्यांमधील पाण्याची पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून झाडे उमळून पडल्यामुळे किमान १० घरांचे नुकसान व वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडले आहेत.

झांझरोळी बंधाऱ्याला धोका

केळवे रोड पूर्वेकडील झांझरोळी येथील बंधाऱ्याच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळून पडल्याचे सकाळी निदर्शनास आले. या बंधार्‍यात सध्या ३.२४२ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा असून सांडव्याद्वारे २.९५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या ठिकाणी धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच बंधाऱ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना जिल्हा प्रशासनाने हाती घेतले असून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची तुकडी त्या ठिकाणी तैनात ठेवण्यात आली आहे. परिसरातील आठ गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून बंधाऱ्यालगतच्या २५० कुटुंबांच्या स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे.