पालघर : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक दुर्ग कोटांत माहीम किल्ल्याचा समावेश असून या ऐतिहासिक माहीम किल्ल्याच्या बांधकामाचा भाग कोसळला. सुदैवाने घटना घडली त्या प्रसंगी पर्यटक त्या ठिकाणी नसल्याने अनर्थ टळला. १०० वर्षांपेक्षा जुन्या या किल्ल्याकडे राज्य व केंद्रीय पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन, सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र, स्थानिक प्रशासन अंतर्गत या किल्ल्याची डागडुजी केली नसल्याने हा किल्ला धोकादायक स्थितीत आहे.

माहीम गावातील सरकारी रुग्णालयाच्या मागे माहीम कोटाचे अवशेष पाहण्यासाठी मिळतात. असंरक्षित स्मारक यादीत असलेला माहीम कोट उपेक्षित असून नित्य ढासळत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचे पडसाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर देखील दिसून आले आहे. पुरातत्व विभाग किंवा स्थानिक कोणतेही प्रशासन आपल्या इतिहासाबाबत पूर्णपणे अनास्था जपून असल्याने पालघर जिल्ह्यातील अवशेष भुईसपाट होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माहीम किल्ल्यातील चिरेबंदी पायरी मार्गाच्या वरील भागात असणारे चौकोनी बांधकाम भीषण पध्दतीने खाली कोसळले.

कोसळलेल्या या चौकोनी बांधकामाचे वजन जवळपास ७० किलो अंदाजित आहे. घटना घडली त्यावेळी पाऊस सुरू असल्याने किल्ल्यावर पर्यटक उपस्थित नव्हते. सर्व मोठ्या दगडांचा ढिगारा सध्या किल्ल्यातील पायरी मार्गावर विखुरलेला आहे. सोबत या पायरी मार्गाच्या उजव्या अंगास असलेली जवळपास १२ फुटांची भिंत आता कोणत्याही क्षणी कोसळून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किल्ल्यावर याबाबत कोणतेही सूचना फलक लावलेले नाही. किल्ल्याकडे फक्त व्यावसायिक दृष्टीने पाहणारे कोणतेही पर्यटक, नवीन दुर्गमित्र संस्था, छायाचित्रण करणारे लोक येथील कोणत्याही भिंतीवर चढून फोटो काढताना दिसतात.

स्थानिक ग्रामपंचायत विभागाने किल्ला तातडीने कुलूप लावून बंद न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. गेली पाच दिवस दुर्गमित्रांनी किल्ल्यावर केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत प्लास्टिक ग्लास, दारूच्या बाटल्या स्पष्ट दिसून आल्या आहेत. किल्ल्यावर दारुबाजांचा मुक्त वावर सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन विषयाचा सातत्याने मागोवा घेणाऱ्या किल्ले वसई मोहीम परिवाराने जवळपास गेली २२ वर्षे नियमित माहीम कोटाची स्वच्छता केली आहे. गेली दोन वर्षे किल्ल्यातील भिंतीची कमकुवत परिस्थिती पाहून परिवार अंतर्गत किल्ल्याची धोकादायक स्थिती पाहून दुर्गसंवर्धन बंद ठेवण्यात आले आहे. माहीम कोटाची दुरवस्था येत्या काळात चिंतेचा विषय होणार असून लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाने या किल्ल्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी दुर्गमित्र करीत आहेत..

माहीम कोटाची पुरातत्वीय बांधणी लक्षात घेऊन तत्परतेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था यावर चर्चा संवाद करण्यासाठी संबंधित विभाग फारसे उत्सुक नाहीत. पालघर जिल्ह्यातील माहीम कोटाचा इतिहास केवळ वसई मोहिमेपुरती संबंधित नसून त्यातील प्राचीन दुवे लक्षात घेणे आवश्यक आहेत. – श्रीदत्त राऊत, इतिहास