वसई:- स्मार्ट मीटरच्या नावाखाली केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामान्य वीजग्राहकांची उघडउघड लूट करत आहे. कालपर्यंत ज्या कुटुंबांना ७०० ते १,००० रुपये वीज देयक येत होते, त्यांना आता थेट तीन ते पाच हजार रुपयांचे अवाजवी देयके येत असल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात ढकलले जात आहेत असा घणाघाती आरोप करत वसई-विरारमधील सर्व राजकीय पक्षांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
महावितरणकडून ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांची संमती न घेता चोरासारखे जुने मीटर काढून नवीन ‘स्मार्ट मीटर’ बसवले जात असल्याच्या तीव्र तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. धुणी-भांडी करून हातावर पोट भरणाऱ्या गरीब कुटुंबांवर या वाढीव देयकांचा प्रचंड ताण पडत आहे. याविरोधात बहुजन विकास आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, समाजवादी पार्टी आणि लाल बावटा या सर्वपक्षीय नेत्यांनी व सामाजिक संघटनांनी सोमवारी महावितरणच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढला होता वीज शुल्क,
आकार शुल्क आणि इतर विविध चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांना दीड ते दोन पटीने वाढीव देयके दिली जात असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला.स्मार्ट मीटर हे अदानी यांच्या आर्थिक फायद्यासाठीच असून अधिकारी नागरिकांशी गुळगुळीत बोलून दिशाभूल करत आहेत,असा आरोप शिवसेना नेते माजी आमदार विलास पोतनीस यांनी केला.केंद्र व राज्य सरकारने केलेली सक्ती ही सर्वसामन्या ग्राहकांच्या विरोधात आहे. ग्राहक हक्क सुरक्षित राहिला पाहिजे, नुसतं मीटर स्मार्ट करून चालणार नाही तर वीज पुरवठा ही सुरळीत असायला हवा असे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी सांगितले.दिवसांतून ८ ते १० वेळा वीज खंडित होत असताना आधी शहरातील कोलमडलेली वीज वितरण व्यवस्था सुधारा, नंतरच स्मार्ट मीटरचा आग्रह धरा, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी मांडली. तर यावेळी जमलेल्या ग्राहकांनी वीज देयकांची होळी करत महावितरणच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.यावेळी अधीक्षक अभियंता माणिक राठोड यांनी आंदोलनकर्त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारून या सर्व मागण्यांबाबत वरीष्ठ स्तरावर पाठविले जाईल असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा
महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी येत असून हे मीटर केवळ नावालाच ‘स्मार्ट’ आहेत. परंतु देयकांमध्ये पावणे आठ आहेत. जनतेच्या हितासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले असून, ‘अस्मार्ट मीटर रद्द करा’ अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. गणेशोत्सवानंतर याविरोधात आतापर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन छेडण्यात येईल आणि जोपर्यंत हे स्मार्ट मीटर पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलने सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
