पालघर : दहीहंडी उत्सवानंतर रुग्णालयात दाखल गोविंदांची सुटका करण्याच्या प्रयत्नात रुग्णालय कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल घरत याची पालघर पोलीस ठाण्यात हजर झाला. पालघर दिवाणी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या या आरोपीला शिवसेनेतून निलंबित करीत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पालघर येथील रिलीफ रुग्णालयात दाखल गोविंदांच्या उपचारा संदर्भात चौकशी करताना रुग्णालय फोडण्याची धमकावणी तसेच महिला वैद्यकीय अधिकारी यांना शिवीगाळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी केल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून या संदर्भात धुडघूस घातली जात असताना पालघर शहर प्रमुख राहुल घरत यांनी स्वागत कक्षामधील कर्मचाऱ्याला कानशिलात बजावली. त्यानंतर त्यांनी अतिदक्षता विभागात जाऊन रुग्णांना बळजबरी सोडून देण्यास प्रवृत्त केले असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे १० स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अन्य सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध पालघर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था अधिनियम अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली.
या प्रकरणात १० पैकी सहा ते सात आरोपींनी आज पालघर पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हजर झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात राहुल घरत याला अटक केली आहे .राहुल घाात याला पालघर न्यायालयात हजर केले असता सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती एस.आर बांदल यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
रुग्णालयातील धुडगूस प्रकरणात असणाऱ्या इतर आरोपी यांची भूमिका पोलीस सध्या तपासत असून या मंडळींनी अतिदक्षता विभागात नेमके काय केले याचे चित्रीकरण तपासले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी लोकसत्ताला दिली. यानंतर इतर आरोपींवर कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन प्रकरणात सुनवणी करताना पालघर प्रकरणाचा उल्लेख झाला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने रमेश म्हात्रे प्रकरणाची सुनावणी करताना कुंदन संख्ये यांच्याशी संबंधित ताज्या घटनेचा उल्लेख केला. या प्रकारांबाबत न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त करत म्हटले की, “हे लोक रस्त्यावर मोकाट फिरण्यास पात्र नाहीत. परिस्थिती अधिकाधिक बिघडत चालली आहे. काल पालघरमध्ये आणखी एक घटना घडली. त्याच लोकांच्या गटाने पुन्हा एकदा डॉक्टरांवर हल्ला केला.”
राहुल घरत पक्षातून निलंबित
पालघर येथील खासगी रुग्णालयात डॉक्टरांसोबत झालेल्या गैरवर्तनाची शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे पक्षातून निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. गोव्यात आयोजित पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोवा येथील पत्रकारांनी पालघर धुडघूस प्रकरणात विचारणा केली असता पालघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. डॉक्टरांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करणे उचित नाही. अशा घटनांना शिवसेना पाठीशी घालणार नाही. रुग्णाच्या बाबतीत काही गैरप्रकार घडला असेल तर कायदेशीर तक्रार करणे आवश्यक होते. कायदा हातात घेणं उचित नाही. त्याचे समर्थन शिवसेना करणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. या घटनेत मारहाण करणारे शिवसेना शहर प्रमुख राहुल घरत यांचे निलंबन करण्यात येईल. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरांवर केलेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही, शिवसेना समर्थन करणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
