देशातील पहिले अणुऊर्जा केंद्र, आशिया खंडातील सर्वात मोठी तारापूर औद्योगिक वसाहत, राज्य मासा म्हणून प्रसिद्ध असणारे सातपाटी येथील पापलेट, वाड्याचा कोलम तांदूळ, घोलवडचा चिकू अशा बाबींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पालघर जिल्ह्याला गेल्या काही वर्षांमध्ये एकापाठोपाठ एक बदनामीच्या घटनांनी ग्रासले आहे. पालघर येथील रुग्णालयात शिवसैनिकांनी घातलेली धुडगूस व केलेली मारहाण सध्या देशभरात चर्चेचे कारण ठरले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर नोव्हेंबर २०१२ मध्ये घडलेले पालघर फेसबुक प्रकरण अनेक वर्ष गाजत राहिले. ऑगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्ह्याची प्रगती होईल, येथील आदिवासी बांधवाकरिता पायाभूत सुविधांचा स्तर उंचावेल, दळणवळणाची साधने सुधारतील तसेच प्रशासकीय दृष्ट्या जिल्ह्याचे नियोजन करणे सोयीचे पडेल असे अपेक्षित होते. या कामांना आरंभी अपेक्षित गती मिळाली नसताना जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यू असे प्रकार घडतच राहिले. त्यानंतर करोना काळात एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्याच्या उत्तरेकडील सीमा भागात घडलेले साधू हत्याकांड प्रकरण देखील जिल्ह्याच्या बदनामीचे कारण ठरले होते.

जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनांमुळे बसलेल्या डागांमधून जिल्हा सावरत असताना ५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने एका रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात वाजवल्याने त्याच्या आवाजाचे देशभरात गुंजन झाले. दहीहंडी उत्सवा दरम्यान जखमी झालेल्या रुग्णालयात दाखल गोविंदांना सोडण्यापूर्वी उपचारावर झालेला खर्च अदा करण्यात यावा याबाबत तडजोड होत असताना अन्य एका गोविंदाला एमआरआय करण्यासाठी पाठविण्याची गरज काय होती यावरून सुरू झालेली दमदाटी पर्यंत पोहोचली. त्यावर न थांबता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दाखल रुग्णांना बळजबरीने सोडवून नेल्याचे तसेच अतिदक्षता विभागात गैररीत्या शिरल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

शिवसैनिकांनी रुग्णालयात घातलेली धुडगूस संदर्भातील चित्रफित देशभरात वायरल झाली, वाहिन्या तसेच माध्यमात घडलेल्या प्रकाराला ठळकपणे प्रसिद्धी दिली गेली. प्रथम सर्वोच्च न्यायालयाने व नंतर मुंबई उच्च न्यायालयाने या घडलेल्या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. परिणाम या प्रकरणाला मोठ्या प्रमाणात अपप्रसिद्धी मिळत राहिली. या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी गोविंदा पथकातील १२ सदस्यांसह एकूण २३ व्यक्तींना अटकेत घेतले आहे. विशेष म्हणजे या प्रकाराचे वैद्यकीय समुदाय व त्यांच्या संस्थांनी हस्तक्षेप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याबद्दल संबंधित राजकीय पक्षाचे पदाधिकारी जाहीरपणे मान्य करत असून आजवर याबाबत कोणीही समर्थन केलेले नाही. मात्र हा प्रकार घडण्यापूर्वीच्या काही घटना देखील महत्त्वपूर्ण आहेत. मोठ्या रकमेचे बक्षीस असणारे दहीहंडी उत्सव साजरा करताना आवश्यक पूर्वतयारी झाली नसल्याचे मत आयोजनातील काही मंडळींकडून खाजगीत सांगितले जात आहे. विशेष म्हणजे बाळ गोविंदांना वरच्या थरामध्ये चढवताना वयोमर्यादेचे पालन व्हावे यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या सूचना तसेच रात्री ११ वाजल्यानंतर डीजेचा आवाज कमी करण्यावरून अथवा कार्यक्रम आटोपशीर घेण्यासंदर्भात पोलिसांच्या सूचना अरेरावीपणे धुडकावण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान हंडीची उंची, गोविंदा पथकांसाठी हेल्मेट, सुरक्षा बेल्ट, छाती रक्षक जॅकेट तसेच सुसज्ज प्रथमोपचार केंद्र (व्यवस्था), रुग्णवाहिका तसेच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी करारनामा, गोविंदा पथकांसाठी विमा कवच इत्यादी बाबी देखील दुर्लक्षित राहिल्याने या प्रकारानंतर आयोजनातील त्रुटीबाबत आक्षेप नोंदवले जाऊ लागले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करण्याऐवजी काही निवडक पदाधिकाऱ्यांनी दाखविलेला अरेरावीपणा अथवा परिस्थितीचे गांभीर्य वेळेस न समजल्याने हा प्रसंग उद्भवल्याचे दिसून आले आहे.

या प्रकारात पालघर पोलिसामध्ये तक्रार झाल्यानंतर स्वतःहून हजर होण्यासंदर्भात आरंभी संबंधितांनी दर्शविलेल्या तयारीला अनुसरून न वागता संबंधित रुग्णालयाच्या मालकाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायदे अंतर्गत कारवाई करण्यासाठी करण्यात आलेला हट्ट व त्यानंतर संशयित आरोपींनी केलेले पलायन हे हे प्रकरण चिघळण्यासाठी कारणीभूत ठरले. डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत जोडले गेल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे हे रुग्णालयामधील शिवसैनिकांकडून झालेले धुडगूस प्रकरण पुढील काही दिवस धुमसत राहील अशी शक्यता आहे.