पालघर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून यंदा ५६ हजार १३९ परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा पारदर्शक, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने कंबर कसली असून, गेल्या वर्षी कॉपीचे प्रकार घडल्यामुळे नालासोपारा येथील एक परीक्षा केंद्र यंदा रद्द करण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकूण २८८ शाळांमधील ५६१३९ विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, त्यांच्यासाठी ६९ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन चोख राहावे यासाठी १२ परिरक्षण केंद्रे (कस्टडी) तैनात आहेत. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी २२४६ खोल्या आणि तितकेच पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सीसीटीव्हीचा कडा पहारा आणि भरारी पथके

कॉपी बहाद्दरांना रोखण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ५४ केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही कव्हरेज आहे. उर्वरित १५ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. तर सर्व ६९ केंद्रांच्या गेटवर आणि वराड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी ५ बैठी पथके आणि १० विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

नालासोपारा येथील केंद्र रद्द, ५ केंद्रे ‘संवेदनशील’

गेल्या वर्षी (मार्च २०२५) नालासोपारा येथील ज्ञानसागर ज्युनिअर कॉलेजमध्ये ५ कॉपी केसेस सापडल्या होत्या. याची गंभीर दखल घेत शिक्षण मंडळाने यंदा हे केंद्र रद्द केले आहे. तसेच, प्रशासनाने जिल्ह्यातील ५ केंद्रांना ‘संवेदनशील’ घोषित केले असून तेथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये के.व्ही. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (जव्हार), पंकज दयाभाई ज्युनिअर कॉलेज (पालघर), मोरेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (नालासोपारा), श्री किशोर मंगलमूर्ती ज्युनिअर कॉलेज (बावसेतपाडा), मदन वेलंकीनी ज्युनिअर कॉलेज (नालासोपारा) या केंद्रांचा समावेश आहे

१०० मीटर परिसरात जमावबंदी, पोलीस प्रशासनाचे आदेश

मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवण्यास मनाई, केंद्राबाहेरील झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स आणि एसटीडी बूथ परीक्षा काळात बंद राहतील. तसेच मोबाईल फोन आणि स्मार्ट वॉच वापरण्यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहावे

पहिल्या पेपर करिता विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकरीत्या तणाव दिसून येत असतो. मात्र, शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. “विद्यार्थ्यांनी संतुलित आहार, पुरेशी झोप घेऊन भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे.