पालघर: केंद्र सरकारच्या विविध योजना आर्थिक दुर्बल घटकांपर्यंत पोहोचायला हव्यात याबाबत माहिती घेण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासकामांच्या लेखाजोखा घेऊन दुर्लक्षित बाबी केंद्र सरकारकडून पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्यासाठी भाजपतर्फे राज्यातील १६ लोकसभा क्षेत्रांमध्ये लोकसभा प्रभाग योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये पालघर लोकसभा क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.

या क्षेत्रातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय मंत्री बिश्वेश्वर तुडू यांची नेमणूक करण्यात आली आहे. याविषयी भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोर येथे पत्रकारांना माहिती दिली. केंद्रातील योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसभा प्रभाग योजना राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत वेगवेगळे २१ कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

पुढील १८ महिन्यांत या योजनेतील जिल्हा समन्वयक जिल्ह्यात  सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मंडळींना भेटून समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी आढावा घेऊन जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष केंद्रित करणार आहेत.