पालघर : केंद्र शासनाच्या “हर घर जल” या महत्त्वकांक्षी नळपाणी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या ५६३ योजनांपैकी २०३ योजनांचे (३६ टक्के) काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात २६ योजनांची (४.६२ टक्के) हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अपूर्ण असणाऱ्या बहुतांश नळ पाणी योजनांमुळे जिल्ह्यातील किमान ५० हजार लोक वस्तीला टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे आवश्यक झाले आहे.

शासनाच्या हर घर जल या घरापर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात ५६३ योजनांचा आराखडा तयार करण्यात आला होता. या कामांसाठी ९३५.६४ कोटी रुपयांची आवश्यकता अंदाजीत करण्यात आली होती. विविध स्तरांवर झालेल्या योजनांच्या कामावर ४५९ कोटी रुपयांचा खर्च झाला असून संबंधित ठेकेदारांच्या देयकांच्या अनुषंगाने १४१.०५ कोटी रुपयांचे थकबाकी शासनाकडे प्रलंबित आहे. जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर २०२५ मध्ये १६.८० कोटी रुपये तर जानेवारी २०२६ मध्ये अवघ्या दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. राज्यात बहुतांश ठिकाणी प्रलंबित देयकांच्या संदर्भात अशीच परिस्थिती असल्याने सर्व ठेकेदारांनी १५ एप्रिल पासून जल जीवन योजनेतील कामे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नळपाणी योजनांची आखणी घाईगडबडीत झाल्याने अनेक ठिकाणी योजना राबविताना ठेकेदारांना अडचणीला सामोरे जावे लागले होते. तसेच अनेक ठिकाणी वन विभागाची जमीन, खाजगी जमिनी, गुरचरण अथवा ग्रामपंचायतच्या मालकीच्या जमिनी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी व जलवाहिनी टाकण्यात अडचणीच्या ठरत असल्याने परवानगी मिळण्यास विलंब झाला होता. त्यात काही ठिकाणी योजनेकरिता प्रस्तावित पाण्याचे स्रोत्र कोरडे पडत असल्याने अथवा अयोग्य ठरत असल्याने त्याचप्रमाणे टाकीची जागा वादीत ठरल्याने, जलवाहिनी टाकण्याचा मार्ग बदलण्याची आवश्यकता भासल्याने व वाढीव वितरण वाहिनी टाकण्याचे काम आवश्यक भासल्याने २२३ (४० टक्के) योजनांमध्ये सुधारित अंदाजपत्रक देण्याची पाळी ओढावली आहे. त्यापैकी तब्बल ४५ टक्के ठिकाणी पाणी योजनेतील स्त्रोत्र बदलणे भाग ठरले आहे.

वन्यजीव विभागाकडे असणाऱ्या जागेमधून योजनेची उभारणी करण्यासंदर्भात परवानगी प्राप्त होण्यास अडचणी निर्माण झाल्याने जिल्ह्यातील चार नळ पाणी योजनांचे काम २५ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. तर ३७ योजनांचे काम २६ ते ५० टक्क्यां दरम्यान, १०६ योजनांचे काम ५१ ते ७५ टक्क्या दरम्यान, २१३ योजनांचे काम ७६ ते ९९ टक्क्यां दरम्यान झाले असून २०३ योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. पूर्ण झालेल्या योजनांचे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरण करणे प्रक्रिया अनेक ठिकाणी प्रलंबित राहिली असून काही ठिकाणी ठेकेदारांना पूर्ण झालेल्या योजना कार्यरत ठेवण्यासाठी स्वखर्चातून विद्युत ग्राहकांचा भार उचलावा लागत आहे. तर हस्तांतरित झालेल्या योजनांचे विजेचे देयके देण्यास काही ग्रामपंचायतीला शक्य न झाल्याने या योजनांचा वीज प्रवाह खंडित करण्याची नामुष्कीली ओढवली आहे.

पूर्ण योजनांच्या हस्तांतराबाबत निरुत्साह

नळ पाणी योजनेअंतर्गत २०३ योजनांचे काम १०० पूर्ण झाले असून त्यापैकी ९६ योजना हर घर जल योजनेच्या निकषानुसार हस्तांतरासाठी पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी फक्त २६ योजनांचे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरण झाले असून हस्तांतरासाठी स्थानीय पातळीवर निरुत्साह असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी योजना पूर्णत्वाच्या वाटेवर असताना स्थानिक ग्रामपंचायतीकडून असहकार्य तर काही ठिकाणी आडकाठी दिली जात असल्याचे आरोप होत आहेत. ही योजना ग्रामपंचायतीने राबवण्यास आरंभ केल्यास मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वीज देयकाची जबाबदारी ग्रामपंचायत स्वीकारण्यास तयार नसल्याचे देखील समोर आले आहे. एकीकडून शासन पूर्ण झालेल्या कामाचे रनिंग देयके देत नसताना ग्रामपंचायतीकडून होणाऱ्या असहकार्यामुळे ठेकेदार मंडळी दुहेरी पेचामध्ये मध्ये सापडली आहेत.

कालमर्यादेत पूर्तता होणे आवश्यक

हार घर जल योजनेतील ७७ टक्के काम ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून निधीच्या कमतरतेसह वेगवेगळ्या कारणामुळे या योजना कार्यरत होऊ शकल्या नाहीत. अशा अपूर्ण योजनांमधून स्टीलचे पाईप, व्हॉल्व, विद्युत प्रणाली मधील रोहित्र, वितरण व्यवस्था व इतर उपकरणांची चोरी स्थानीय पातळीवर होत असून शासनाने या योजनेच्या पूर्ततेसाठी कालमर्यादा निश्चित करून निधी उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. कोणत्याही कारणाने पुढील सहा आठ महिन्यात या योजना अपूर्ण राहिल्यास चोरी झालेल्या उपकरणां च्या अनुषंगाने शासनाला वाढीव खर्च सोसावं लागेल अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात ५० लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा

पालघर जिल्ह्यातील २४ गावे व ७९ पाड्यांवरील ३६ हजार जनसंख्या व १४ हजार पशुधन असे सुमारे ५० लोकसंख्येच्या १२ हजार लिटर क्षमतेच्या
३२ टँकरच्या ९६ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जव्हार, मोखाडा, वाडा या तीन तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर पाणीटंचाई कार्यक्रम अंतर्गत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास आरंभ केला असून वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांची मागणी व परिस्थिती पाहून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आखली जात आहे.

सद्यस्थितीत जव्हार मधील १६ गावे व २३ पाड्यांमधील ३० लोकवस्तीला १७ टँकरच्या ५३ फेऱ्यांमधून पाणीपुरवठा होत आहे. मोखाडा तालुक्यातील दोन गावे व २१ पाड्यांमधील सुमारे १० हजार लोकवस्तीला नऊ टँकरच्या २३ फेऱ्यांमध्ये सध्या पाणीपुरवठा होत आहे. तर वाडा तालुक्यातील सहा गाव व ३५ पाड्यामधील सुमारे ११ हजार लोकसंख्येला सहा टँकरच्या २० फेऱ्यांमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

मोखाड्यातील टँकर संख्या घटली

मोखाडा तालुक्यात अपर वैतरणा मधून ५६ गावांसाठी सामूहिक पाणीपुरवठा योजना आखण्यात आली असून जलशुद्धीकरण प्रकल्पासह ९२ टाक्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. काही मोजक्या गावपाड्यांमध्ये या योजनेतील पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली असून पूर्वी मोखाड्यात लागणार ३५ पाण्याच्या टँकर ऐवजी सद्यस्थितीत नऊ टँकरद्वारे दुर्गम भागातील लोकसंख्येची तहान भागवली जात आहे.