बोईसर: पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्याला राज्याच्या पर्यटन नकाशात अग्रस्थानी आणण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. स्वातंत्र्यदिनी दाभोसा धबधबा येथील काचेचा पूल पर्यटकांसाठी खुला झाला असून कासटवाडी येथील झीप लाईन या साहसी प्रकल्पाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. जव्हार मधील या दोन नवीन उपक्रमामुळे पर्यटनामध्ये अधिक वाढ होऊन असून स्थानिकांना देखील रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका पर्यटनदृष्ट्या समृद्ध असून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. दाभोसा धबधबा येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काचेच्या पुलाची उभारणी करण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवीन काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तर जव्हार जवळील कासटवाडी गावा जवळील खोल दरीवर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून एक कोटी २० लाख रुपये निधी खर्च करून टू वे झिप लाईन प्रकल्प साकारण्यात आला आहे.

जव्हार वनविभागा तर्फे उभारण्यात आलेला झीप लाईन हा साहसी प्रकल्प पूर्ण झाला असून १५ ऑगस्ट रोजी आमदार हरिश्चंद्र भोये आणि जव्हार वनविभागाचे उपवनसंरक्षक सैपुन शेख यांच्या उपस्थितीत सुरक्षात्मक चाचणी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. सध्या टू वे झिप लाईनच्या ठिकाणी सुरक्षात्मक कठड्यांचे काम सुरू असून सप्टेंबर महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर झीप लाईन प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. झीप लाईन हा पालघर मधील पहिलाच उपक्रम असून पर्यटकांना जव्हार मधील पावसाळी पर्यटनासोबतच साहसी पर्यटनाचा देखील थरारक अनुभव घेता येणार आहे.

वर्षभर पर्यटनवाढीसाठी प्रयत्न :

जव्हार तालुक्यातील पर्यटन हंगाम हा वर्षातील जून ते फेब्रुवारी या सहा ते आठ महिन्यांच्या कालावधीपुरता मर्यादित आहे. त्यानंतर पाण्याची तीव्र टंचाई आणि उन्हामुळे आलेला रुक्षपणा यामुळे जव्हारला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट होते. जव्हार मधील पर्यटन हंगाम वर्षभर सुरू राहावा याकरिता पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन आणि जव्हार वनविभागातर्फे धरणांच्या काठावर पर्यटकांसाठी कॅम्पिंग सुविधा, आदिवासी संस्कृती आणि पारंपारिक खाद्यपदार्थ, तारपा,गौरी नाच, बोहाडा उत्सव, वारली चित्रकलेला प्रोत्साहन, ऐतिहासिक जय विलास पॅलेस आणि शिरपा माळ, भूपतगड किल्ला, मातेरा डोंगर भटकंती यासोबतच बोटिंग, प्रस्तरारोहण, ट्रेकिंग, सायकलिंग, बंजी जंपिंग, व्हॅलि क्रॉसिंग आणि इतर साहसी पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.