बोईसर : नदीतील वाळू चोरी प्रकरणी कारवाई न करण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जव्हार तालुक्यातील दोन ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी दोन्ही महसूल अधिकाऱ्यांविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रधानमंत्री ग्राम आवास योजना अंतर्गत घरकुलाच्या बांधकामासाठी लेंडी नदी पात्रातून वाळू काढून ती ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करताना १० फेब्रुवारी रोजी जव्हार तालुक्यातील जामसर सजा चे ग्राम महसूल अधिकारी गजानन नागेश जोहरे व हिरडपाडा सजा चे ग्राम महसूल अधिकारी सिताराम विष्णू इंधन यांनी तक्रारदार यांना पकडले होते.

दोन्ही ग्राम महसूल अधिकारी यांनी विनापरवाना वाळू चोरी विरोधात कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी ११ फेब्रुवारी रोजी एकूण लाचेच्या मागणी पैकी २० हजार रुपये महसूल अधिकाऱ्यांना दिले तसेच उर्वरित २० हजार रुपये दिले नाहीत तर वाळू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर जप्त करण्याची धमकी दिली. मात्र तक्रारदार यांना अधिक लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने ११ फेब्रुवारी रोजी केलेल्या पडताळणीमध्ये दोन्ही ग्राम महसूल अधिकारी यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या सापळा कारवाईमध्ये महसूल अधिकारी सिताराम विष्णू इंधन यांच्या प्रोत्साहनावरून ग्राम महसूल अधिकारी गजानन जोहरे यांनी लाच स्वीकारताना जव्हार येथील तलाठी कार्यालयात पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडण्याची कारवाई केली.

यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम सात, सात – अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर येथील उपाधीक्षक दादाराम कारंडे, पुलिस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, योगेश धारणे, जितेंद्र गवळे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.