पालघर : पालघर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २८६८ पावसाची नोंद झाली असून यंदाच्या फक्त जुलै महिन्यात तब्बल १७४७ मिलिमीटर (६१ टक्के) पावसाची नोंद झाली. यामुळे जव्हार व मोखाडा वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये काही प्रसंगी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे २२ ते २४ जुलै दरम्यान झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे तलासरी तालुक्याने संपूर्ण हंगामातील पावसाच्या १११ टक्के पर्जन्यमान जुलै महिन्यात अनुभवले.

जिल्ह्यामध्ये पालघर तालुका (१९०० मिलिमीटर) वगळता इतर सर्व तालुक्यांची संपूर्ण पावसाळ्यात पर्जन्यमानाची सरासरी ही २१०० ते २७१० मिलीमीटर दरम्यान असून जिल्ह्यात जुलै अखेरीस १९८७ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद आहे. या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात जेमतेम ३४५ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद जिल्ह्यात झाली होती.

जुलै महिन्यात तलासरी तालुक्यात २३६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून डहाणू तालुक्यात १७९० मिलिमीटर, पालघर तालुक्यात १७५६ मिलिमीटर, वाडा तालुक्यात १७२५ मिलिमीटर, विक्रमगड तालुक्यात १६८६ मिलिमीटर, जव्हार तालुक्यात १३८७ मिलिमीटर, वसई तालुक्यात १३३० मिलिमीटर तर मोखाडा तालुक्यात १२०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय संपूर्ण हंगामात पडणाऱ्या सरासरी पावसापैकी फक्त जुलै महिन्यात डहाणू तालुक्यात ९४ टक्के, पालघर तालुक्यात ७२ टक्के, विक्रमगड व वाडा तालुक्यात प्रत्येकी ६६ टक्के, जव्हार तालुक्यात ५२ टक्के तर वसई तालुक्यात ४९ टक्के पाऊस झाल्याने अनेकदा ठिकठिकाणी आपत्कालीन व पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

जुलै महिन्यात १२ दिवस अतिवृष्टी

जुलै महिन्यात १२ दिवसात ६४.५ मिलिमीटर पेक्षा अधिक (अतिवृष्टी) पावसाची नोंद झाली असून १०० मिलिमीटर पर्यंत तीन दिवस, १०१ ते १५० मिलिमीटर चार दिवस पावसाची नोंद झाली. १५२ ते २०० मिलिमीटर तसेच २०१ ते २५० मिलिमीटर दरम्यान प्रत्येकी दोन वेळा अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असून २३ जुलै रोजी नोंदल्या गेलेल्या (२२ जुलै रोजीचा पाऊस) पावसाने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला. या दिवशी तलासरी परिसरात ९०० मिलिमीटर पाऊस झाल्याचे जिल्हा प्रशासनाने नंतर सांगितले.

धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणे जवळपास पूर्णता भरली आहेत. मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा करणारी तानसा व मोडक सागर धरणे १०० टक्के भरले असून मध्य वैतरणामध्ये ९२.२१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पालघर तालुक्यात झालेल्या पूरजन्य परिस्थिती व आगामी काळात होणारा पाऊस लक्षात घेता धामणी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यात आली असून सध्या धामणी धरणांमध्ये ७०.३२ टक्के उपयुक्त पाणी साठा असून कवडास धरणात ४४.७८ टक्के तर कुर्झे धरणात ४६.८१ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. वांद्री मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण देखील पूर्णपणे भरल्याची माहिती देण्यात आली आहे.