पालघर : सूर्या नदीवरील कवडास या उन्नेयी बंधाऱ्यामधून पाण्याचा विसर्ग सांडव्याद्वारे अनियंत्रित असल्याने पालघर तालुक्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. महानगरपालिकांच्या पाणीसाठ्यासाठी या धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात येणार असताना या धरणाला दरवाजे (गेट) बसवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

१९७६ च्या सुमारास धामणी व कवडास धरणाची उभारणी करण्यात आली होती. धामणी धरणामध्ये १२ मीटर लांब व आठ मीटर रुंद असे पाच दरवाजे बसवण्यात आले होते. मात्र कवडा धरणात मधून नियोजित पाण्याचा साठा झाल्यानंतर सांडव्याद्वारे धरणातून पाण्याचा विसर्ग अनियंत्रित पणे होत असे. यामुळे नदीच्या किनारी असणाऱ्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे प्रकार घडले होते.

सन २००१ मीरा-भाईंदर महानगरपालिकेसाठी पाण्याच्या झालेल्या आरक्षणाच्या अनुषंगाने कवळास धरणाची सध्या असणाऱ्या ६५.२५ मिटर उंची मध्ये १२ मीटर लांब व पाच मीटर रुंदीचे १७ गेट बसवण्यात येणार असून धरणाची उंची ६८.९० मिटर इतकी वाढण्याच्या दृष्टीने आखणी करण्यात आली आहे. गेट बसविण्याच्या प्रक्रियेदरम्यान धरणाचे साठा करण्याची समुद्रसपाटी (सील लेवेल) ६३.९० मिटर इतकी राहणार असून धरणाच्या वाढीव क्षमतेच्या दृष्टीने आवश्यक भूसंपादन यापूर्वीच करण्यात आले आहे. सध्या धामणी धरणातून २१० क्यूमेक पाण्याचा विसर्ग करण्याची क्षमता असताना कवळास मधून ५०२९ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असतो. वाहून जाणारे पाणी धरणामध्ये अधिक प्रमाणात साठवून ठेवण्याच्या दृष्टीने तसेच पाण्याची पातळी वाढल्यास नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यास ही दरवाजे बसवण्याची यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे.

सूर्या नदीवर धामणी धरणात जव्हार तालुक्यातील क्षेत्रामधून पाणी जमा होत असते. तर कवडास धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सायवन व गंभीरगड येथून वाहत येणारा २६ किलोमीटरचा ओहोळ तसेच विक्रमगड तालुक्यातील सरशी येथील १२ किलोमीटरचा ओहोळ जोडला जात असल्याने या धरणा मधून पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात होत असत. दरवाजे बसवण्याच्या या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांमधील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देखरेख आवश्यक

धरणांमध्ये असणारे राखीव पाणीसाठा व पडणाऱ्या पावसाची मात्रा यांचा समग्र अभ्यास करून पाण्याची पातळी पावसाची स्थिती पाहता तुलनात्मक कमी राखण्यासाठी तसेच मुसळधार पावसाच्या वेळी विसर्ग सुरू करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देखरेख ठेवण्याची व्यवस्था उभारण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यास नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कता दर्शवणारी अलार्म प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. कवडास या धरणा मधून पाण्याचा विसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे नसल्याने नदीकाठच्या गावांमध्ये अचानकपणे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असून या धरणाला दरवाजे (गेट) बसवण्यासाठी विभागाला नियोजन करण्याच्या दृष्टीने सुचित करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाच्या प्रसंगी अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क बंद पडत असल्याने संबंधितांपर्यंत संदेश अथवा माहिती जाण्यास अडचणी येत असून अशा आपत्कालीन परिस्थितीत विविध नेटवर्क प्रोव्हायडर कडून नागरिकांना विविध कंपन्यांकडून आपत्कालीन परिस्थिती नेटवर्क अदलाबदली करून बाधित गावांमधील नागरिकांना मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधितांशी चर्चा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.