पालघर : नाताळची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह या ‘थ्री-इन-वन’ योगमुळे पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. विशेषतः केळवे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत असून, आगामी थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी येथील टक् हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आताच बुक झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय व राज्य महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांनी पालघरकडे पाठ फिरवली होती. गणेशोत्सव आणि दिवाळी दरम्यान पर्यटकांनी अलिबाग किंवा इतर पर्यायांना पसंती दिली होती. मात्र, आता मनोर ते वसई-घोडबंदर आणि चारोटी-तलासरी दरम्यानच्या रस्त्याची कामे काही अंशी पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर आला आहे. रस्ते सुखकर झाल्याने पर्यटकांनी पुन्हा एकदा केळवे, डहाणू येथील निसर्गरम्य किनाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.

31 डिसेंबरच्या दिवशी एकादशी येत असल्यामुळे व त्यापाठोपाठ गुरुवार असल्यामुळे अनेक बांधवांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन या महिन्याच्या शेवटच्या शनिवार रविवारी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन साजरा करण्याचे बेत आखले आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केळवे येथील हॉटेल व्यावसायिकांनी खास तयारी केली आहे. यामध्ये २ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत.

मुख्य आकर्षणे: डीजे नाईट, अमर्यादित जेवण (विशेषतः पालघरची प्रसिद्ध ताजी मासळी), रोषणाई, आतिशबाजी आणि टेंट नाईट.
स्थानिक संस्कृती : यंदा अनेक व्यावसायिकांनी ‘लाईव्ह कॉन्सर्ट’चे आयोजन केले असून, यामध्ये स्थानिक कलाकारांना संधी दिली आहे. यामुळे पर्यटकांना संगीतासोबतच स्थानिक संस्कृतीचा आनंद घेता येणार आहे.

बऱ्याच पर्यटकांनी ३१ डिसेंबरचा सूर्यास्त आणि नवीन वर्षाचा सूर्योदय समुद्रकिनारी पाहण्याचे नियोजन केल्याने येत्या आठवड्यात या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता ‘केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघा’ने व्यक्त केली आहे.

‘थर्टी फर्स्ट’ला धिंगाणा घालाल तर ‘हॅपी न्यू इअर’ कोठडीत, पोलीस प्रशासन सज्ज

नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात कुठेही गालबोट लागू नये आणि सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी पालघर पोलीस आणि विशेषतः सफाळे पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

पोलिसांची विशेष खबरदारी आणि कारवाई

१. नाकाबंदी आणि गस्त: ३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या नाक्यांवर आणि समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कडक नाकाबंदी केली जाईल. संशयास्पद हालचालींवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.
२. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई: ‘ब्रिथ अ‍ॅनालायझर’च्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाईल. मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
३. महिलांची सुरक्षा: गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस तैनात असतील.
४. ध्वनी प्रदूषण: ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या डीजे आणि साऊंड सिस्टीमवर कठोर कारवाई केली जाईल.

शांततेत आनंद साजरा करा, कायदा हातात घेऊ नका

नागरिकांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच आनंद साजरा करावा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर किंवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नियम मोडणाऱ्यांची रवानगी थेट पोलीस कोठडीत केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कुठे कुठे होते गर्दी..

पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांमध्ये डहाणू-बोर्डी, केळवा, अर्नाळा, सातपाटी, सुरुची, चिंचणी आणि नंदगाव यांचा समावेश होतो, जे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, स्वच्छ वाळूसाठी आणि मासेमारीसाठी ओळखले जातात, तसेच ऐतिहासिक किल्ले आणि मंदिरांमुळे या किनाऱ्यांना धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.