पालघर : प्रजासत्ताक दिनी केळवे येथील समुद्र किनार्‍यावर १२ वर्षीय मुलीच्या अंगावरून घोडा गाडी जाऊन झालेल्या गंभीर अपघातामुळे या किनार्‍यावरील घोडा गाड्या, ऊंट सफर, बीच बाईक व बोट फेरी व्यवसायावर पोलिसांनी बंदी आणली होती.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यापैकी बीच बाईक व बोट फेरी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून याकरिता आवश्यक परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पर्यटन विभागाकडे अर्ज करण्यात येत आहेत.

२६ जानेवारी रोजी दुपारी झालेल्या अपघातामध्ये एका मुलीच्या अंगावरून टांगा गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली असून ती अजूनही मुंबई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघातानंतर केळवे सागरी पोलिसांनी किनार्‍यावर सुरू असणार्‍या सर्व करमणुकीचे व्यवसाय बंद केले होते.

या दुर्घटनेला पंधरवडा उलटल्यानंतर केळवे सागरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी विजया गोस्वामी यांच्या उपस्थितित किनार्‍यावर उद्योग करणारे व्यवसाय यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी दृकश्राव्य पद्धतीने राज्याच्या पर्यटन विभागाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. राज्य शासनाने मान्यता दिलेल्या साहसी खेळांना तसेच बोटी मधून फेरी मारण्याच्या व्यवसायांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करण्याचे आश्वासित केले.

केळवे समुद्रकिनाऱ्यावर बोटिंग (नौका सफर) करण्यासाठी चार व्यक्तींच्या नऊ बोटींना व नऊ बीज बाईकना परवानगी दिल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परवानांच्या नूतनीकरणासाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्र कालांतराने देणे आवश्यक असून त्याची पूर्तता न झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यापूर्वी परवाने दिलेल्या बीच बाईक व नौका मालकांकडून पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्र पर्यटन विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांचे परवाना नूतनीकरण करण्यात येईल असे या विभागाचे वरिष्ठ अधिकारी रविंद्र पवार यांनी लोकसत्ता ला सांगितले.

किनार्‍यावरील व्यवसायांमध्ये सुसूत्रता हवी

अनेक वर्षांपासून किनार्‍यावरील विविध व्यवसायांशी संबंधित परवानग्या महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) मार्फत दिल्या जातात. मात्र तीन वर्षांपूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींखेरीज इतर परवानगी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. त्यामुळे केळव्यासह इतर किनार्‍यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असणार्‍या व्यावसायिकांना राज्याच्या पर्यटन विभागा कडून परवाने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान बीच बाईक व्यवसायिकांनी किनाऱ्यावर कमी गर्दीच्या ठिकाणी आपला व्यवसाय करावा, यासाठी आवश्यक तिकिट पद्धतीचा वापर करून विशिष्ट पद्धतीने बीच बाईकच्या एका मागून एक पद्धतीने रांगा लावून एकत्रितपणे व्यवसाय करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले.

या साहसी खेळाकरिता विमा मिळत नसल्याची अडचण पुढे आली असून त्यावर तोडगा काढण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. केळवे येथे या व्यवसायाला पुन्हा सुरू करताना सिंगल विंडो पद्धतीने एकत्रित व सुसूत्र पद्धतीने व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात येते असल्याचे रवींद्र पवार यांनी सांगितले.

या संदर्भात केळवे सागरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी विजया गोस्वामी यांच्याशी संपर्क साधला असता पर्यटन विभागाचा आवश्यक परवाने प्राप्त असणाऱ्या किनाऱ्यावरील व्यवसायिकांना परवानगी मध्ये नमूद अटी शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येईल असे स्पष्ट केले. या नियमांचे पालन करण्यासाठी परवाना देणार्‍या विभागाने देखरेख ठेवावी अशी अपेक्षा पर्यटन व्यवसायातील मंडळींनी केली आहे.

घोडा गाडी, उंट सफर याला परवानगी नाही

केळवे समुद्रकिनाऱ्यावर नऊ बीज बाईक ला परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात त्या ठिकाणी १२ पेक्षा अधिक बीच बाईक कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर या ठिकाणी आठ घॊड गाडी (टांगे) व चार उंट पर्यटकांसाठी कार्यरत असून या दोन्ही व्यवसायांना राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून परवानगी देण्याची मुभा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आगामी काळात केळवे व इतर समुद्रकिनार्‍यावर घोडागाडी सफर व ऊंट सफर ला पर्यटक मुकतील अशी चिन्ह आहे.