पालघर : जिल्ह्यात विद्यमान खरीप हंगामात आकडेवारीवरून समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसत असले तरीही प्रत्यक्षात सर्व पिकांना पावसाच्या काही जोरदार सरींची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भाताच्या रोपांमध्ये दाणा भरण्याची (पोटरी) अवस्था असून पीक वाचवण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे.

कृषी विभागाच्या अहवालानुसार पालघर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात १.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर भात, रागी, वरई, कडधान्य, गळीतधान्य यांची लागवड करण्यात आली असून ९९.५३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. भात आणि इतर पिके सध्या जोमदार वाढीच्या अवस्थेत आहेत.

पालघर जिल्ह्याचे एकूण लागवडीलायक क्षेत्र १.४७ लाख हेक्टर असून त्यापैकी खरिपाचे सरासरी क्षेत्र १.०७ लाख हेक्टर इतके आहे. यामध्ये मुख्य पीक असलेल्या भाताची लागवड ८१ हजार ०९२ हेक्टरवर (१०३.१२ टक्के) सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर भात लागवड नोंदवली गेली आहे. याशिवाय नाचणी १० हजार ९४२ हेक्टर, वरई सात हजार ३६३ हेक्टर, कडधान्ये (तूर, उडीद, मूग) पाच हजार ८७४ हेक्टर तर गळीतधान्य एक हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले आहे.

सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान

जिल्ह्यात १ जून ते २३ सप्टेंबर या कालावधीत सरासरी २३६७ मिलिमीटर पर्जन्यमानाच्या तुलनेत प्रत्यक्ष २,४९३.६ मिलिमीटर (१११.८ टक्के) इतका पाऊस पडला आहे. तालुकानिहाय पाहता तलासरी तालुक्यात सर्वाधिक १५१.२ टक्के, डहाणू १३५.९ टक्के, पालघर १११.३ टक्के आणि वाडा तालुक्यात १०५.२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, जव्हार (७८.१ टक्के) व मोखाडा (८९.८ टक्के) या भागात तुलनेने कमी पाऊस नोंदवला गेला. असे असले तरीही हंगामातील सुमारे ८० टक्के पाऊस हा जुलै महिन्यात नोंदविण्यात आला असून त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने बरेच दिवस उघडीप घेतल्याने तसेच झालेला पाऊस किरकोळ प्रमाणात झाल्याने भात पिकाच्या वाढीसाठी अडचणीचे ठरले आहे. राजस्थान मधून परतीचा पाऊस सुरू झाला असून खरीप हंगामातील पिकांना तसेच रब्बी पिकांना किमान दोन पावसाच्या सरींची आवश्यकता आहे.

ऑगस्ट महिनाअखेर झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल तालुकास्तरावरून कृषी विभागाला प्राप्त झालेला नाही. खरीप पिक कीड व रोगमुक्त स्थितीत असली तरी आगामी काळात अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास व तापमान वाढीमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पीक परिस्थिती समाधानकारक; कीड-रोग नियंत्रणात, तरी शेतकरी चिंतातून

ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मुख्य भात पिकाची वाढ समाधानकारक आहे. हळव्या भाताच्या जाती फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असून निमगरव्या जाती पोटरी ते फुलोरा अवस्थेत आहेत, तर गरव्या जाती वाढीच्या ते पोटरी येण्याच्या अवस्थेत आहेत. या तिन्ही वर्गातील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. नाचणी व वरई पिके फुटवा ते पोटरीच्या अवस्थेत आहेत.भातावर खोडकीड, सुरळीतील अळी किंवा करप्याचा प्रादुर्भाव अत्यंत अल्प असून कीड व रोग पूर्णपणे नियंत्रणात आहेत. १५ ऑक्टोबर पर्यंत पडणारा पाऊस भात पिकासह पुढील हंगामासाठी अत्यंत मोलाचा ठरणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन

खरीप हंगामातील चांगल्या पावसामुळे जमिनीत उपलब्ध ओलावा लक्षात घेऊन कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन आखले आहे. जिल्ह्याचे रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ९,२१३ हेक्टर आहे. भाताच्या कापणीनंतर जमिनीतील ओलाव्यावर वाल, चवळी, कुळीथ, मूग, हरभरा आणि मोहरी या कडधान्य व गळीतधान्य पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या भागात चवळी, मूग, हरभरा, मोहरी, पांढरा तीळ, मका यासह विविध प्रकारच्या वेलवर्गीय व पालेभाज्यांची लागवड करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्यास रब्बी हंगामात कडधान्य उत्पादनात मोठी वाढ होण्याची आशा व्यक्त होत आहे.