पालघर : पालघर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये १.०८ लाख हेक्टर क्षेत्रफळावर लागवड होणार असून या हंगामात शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, खत पुरवठा या दृष्टीने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. एल-निनो च्या पार्श्वभूमीवर आगामी रबी हंगामामधील पिकांवर परिणाम होऊ नये या दृष्टीने जलसंधारण प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून उपविभागीय व तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच गावनिहाय शिवार फेऱ्यांचे आयोजन पूर्ण करण्यात आले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख आठ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रफळावर लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये ८०.३७ हजार हेक्टर क्षेत्रफळावर भात लागवड, १२.२५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर नागली, सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रफळावर वरई, साडेसहा हेक्टर हजार क्षेत्रफळावर कडधान्य व दीड हजार हेक्टर क्षेत्रफळावर गळीत धान्य लागवडीचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या व गेल्या पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत खरीप लागवड क्षेत्रामध्ये किरकोळ वाढ नियोजित करण्यात आली आहे.
खरीप हंगामातील लागवडीसाठी एकूण १५१९२ क्विंटल भात बियाणाची मागणी असून त्यापैकी महाबीज करून ३०७० क्विंटल, खाजगी उत्पादकांकडून ११४२२ क्विंटल तर विद्यापीठाकडून ७०० क्विंटल बियाणाची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ६०० विंटल संकरित बियाणे व १४५९२ क्विंटल सुधारित बियाण्याचा समावेश आहे. जिल्ह्यात १४.५० हजार मॅट्रिक टन युरिया, ३८०० मॅट्रिक टन इतर खाते व काही प्रमाणात एमओपी, डीएपी, एसएसपी या अशा एकूण १८.९७ हजार मेट्रिक टन खतांचा समावेश आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या दोन- अडीच महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडण्याचे अपेक्षित असून एल-निनो चा विशेष परिणाम जिल्ह्यातील खरीप पिकांवर होणार नाही असे अंदाजीत आहे. सद्यस्थितीत हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात पाऊस काही काळ उघडीप घेण्याची शक्यता असून या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी ९० दिवसात तयार होणारे हळव्या प्रजातीचे भात बियाणे लागवड करावे असे सुचविण्यात आले आहे. शिवाय पावसाच्या आगमनास विलंब झाला तरी अशा हळव्या व निमगरवा (१०० ते १०५ दिवसा तयार होणारी भाताची प्रजात) पद्धतीचे बियाणे लागवड केल्यास ते उपयुक्त ठरू शकेल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यासाठी तसेच जागतिक सद्यस्थिती पाहता युरियाच्या सोबतीने इतर पर्यायी खत व सेंद्रिय खत यांच्या वापरावर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन पीक योजना तसेच जमीन आरोग्य पत्रिका बाबत पृथ्वी आराखडा तयार करण्यात आला असून जिल्ह्यात शेततळे कामांसाठी नियोजन व इतर कृषी क्षेत्रातील कामांबद्दल नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी दिली आहे.
नैसर्गिक शेतीसाठी नियोजन
जिल्ह्यातील डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत पाच हजार हेक्टर, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत १३०० हेक्टर व परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत ८५० हेक्टर अशा तिन्ही योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७१५० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती खाली आणले जाणार आहे. जिल्ह्यातील नऊ हजार पेक्षा अधिक शेतकरी या नैसर्गिक शेती योजनेमध्ये सहभागी होणार असून या शेतकऱ्यांच्या शेतावर जैविक बीज प्रक्रिया, रासायनिक निविष्ठा अवलंब कमी करणे किरीट निमास्त्र, ब्रह्मास्त्र दशपर्णी अर्क इत्यादी निविष्ठांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दृष्टिकोनातून गट स्तरावर मे अखेरपर्यंत किमान ६१७ जैविक निविष्ठा केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
एल- निनो’चा प्रभाव टाळण्यासाठी
रबी हंगामातील पिकप ही पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या पर्जन्यमानावर तसेच जमिनीमधील अवशिष्ट आर्द्रता (रेसिडेल मोईश्चर) यावर अवलंबून असून एल-निनो चा प्रभाव म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पाऊस काही कमी प्रमाणात होईल या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. जलसंधारणाच्या दृष्टिकोनातून पाऊस संपल्यानंतर जिवंत ओहोळांवर जिल्ह्यात ४२९ वनराई बंधारे उभारण्याचे लक्षांक ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याचा निचरा जमिनीत व्हावा या दृष्टीने प्रत्येक पाच फूट लांब वरून तसेच सहा फूट खोल खड्डे खणून त्यामध्ये विटांचे तुकडे टाकून जिल्ह्यात २८६ जलतारा रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा उभारण्यात येत आहेत.
