कृषि दिनानिमित आणि वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत नियतक्षेत्र संरक्षित वन नवली येथे बीज गोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कृषि दिनानिमित पालघर वनपरिक्षेत्र पालघर कार्यालय, पालघरनगर परिषद तसेच सेंट जॉन महाविद्यालय यांच्या संयुक्त सहभागातून नवली नियतक्षेत्र येथील संरक्षित वन क्षेत्रातील मोकळ्या जागेत ८५ विद्यार्थी, तरुण, गावकरी वन कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी यांनी सुमारे २५ हजार बीज गोळ्यांचे (Seed Balls) फेकून वृक्ष लागवड करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीज गोळे पावसाळ्यात उगवून त्यापैकी सुमारे ६५ ते ७९ टक्के बीजांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याने हा उपक्रम वनसंवर्धनासाठी प्रभावी ठरणार आहे. तसेच जंगली प्रजातीची १०० वृक्ष लागवड यावेळी करण्यात आली.
या कार्यक्रमात सीड बॉल आणि वृक्ष लागवड करून पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात भर पावसात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाबाबत सीड बँक तयार करणे, सीड बॉल तयार करणे, रोपे लागवड करणे, ग्लोबल वार्मिंग, तापमान वाढ, वाळवंटीकरण इत्यादी गोष्टीबद्दल युवक, विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जागरूकता निर्माण करणे, पर्यावरण कायद्यांविषयी माहिती देणे तसेच वाढत्या पर्यावरणीय समस्यांबाबत समाजात जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
वनपरिक्षेत्र अधिकारी पालघर सुशील नांदवटे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून देताना पर्यावरण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून प्रत्येकाच्या अस्तित्वाशी निगडित घटक असल्याचे सांगण्यात आले. शुद्ध हवा, पाणी, अन्न, आरोग्य आणि सुरक्षित जीवन यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. वाढते तापमान आणि त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम लक्षात घेता ही बाब आता केवळ शास्त्रज्ञांची चिंता राहिलेली नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित झाली आहे असे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सचिन राठोड यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, त्यांतील प्रमुख वैशिष्ट्ये तसेच त्यांचे पर्यावरणीय महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्यास मारण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित अंतर राखावे, तत्काळ वन विभाग अथवा प्रशिक्षित सर्पमित्राशी संपर्क साधावा, अशी सूचना त्यांनी उपस्थितांना केली. तसेच सर्पदंश झाल्यास कोणतेही अंधश्रद्धाजन्य उपचार न करता जखमी व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे असे त्यांनी सांगितले.
