पालघर : पालघर जिल्ह्याच्या स्थापनेपासून (२०१४) ते सन २०२५ पर्यंत वीज पडून २७ जणांचा मृत्यू ओढावला असून विज पडण्याची प्रक्रिया समजून घेणे तसेच अशाप्रसंगी सुरक्षित राहण्यासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये मे महिन्यात तसेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षणीय असून नागरिकांनी अशा प्रसंगी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे चर्चासत्रा दरम्यान नमूद करण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विजेचा धोका आणि जोखीम निवारण याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी याविषयीचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, आपदा मित्र व अन्य महसूल कर्मचारी सहभागी झाले होते.

पालघर जिल्ह्यात जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तीन तालुक्यांमध्ये विज पडण्याचे प्रमाण अधिक असून हे जिल्हे वीज जोखीम प्रवण क्षेत्रात येत असल्याची माहिती देण्यात आली. डहाणू, तलासरी व वाडा या तालुक्यांमध्ये विजेची जोखीम मध्यम स्वरूपाची असून वादळी परिस्थितीत वीज पडण्याचे प्रकार होत असल्याचे माहिती देण्यात आली.

विज पडल्याचे प्रकाशमान दृष्टिस दिसून आल्यानंतर लगतच्या ३० सेकंदात गडगडाटाचा आवाज ऐकू आल्यास वीज पडण्याचा प्रकार पाच किलोमीटरच्या परिसरात झाल्याचे समजले पाहिजे. अशाप्रसंगी सावधगिरी बाळगणे तसेच शेवटचा विजेचा गडगडाट संपल्यानंतर किमान ३० मिनिट नागरिकांनी सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणी राहावे असा सल्ला याप्रसंगी देण्यात आला.

वीज पडण्यामागील शास्त्रीय कारण तसेच वीज कुठे, कशी, कधी व का पडते याविषयी सविस्तर माहिती या चर्चासत्रात देण्यात आली. राज्यात विजेमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत झालेल्या अभ्यासादरम्यान १५ ते ४० वयोगटातील पुरुषांचा अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याला नागरिकांमधील हलगर्जीपणा, जनजागृतीच अभाव तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे आले आहे. वीज पडणे ही नैसर्गिक क्रिया असून त्यामुळे तयार होणारा नायट्रोजन डायॉक्साईड पाण्यात मिसळून त्यापासून नत्र खत जमिनीला उपलब्ध होत असल्याचे नमूद करण्यात आले.

अचानकपणे वीज पडण्यास सुरूवात झाल्यास नागरिकांनी झोपडी, गोठा अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या निवाऱ्यात उभे न राहता बंदिस्त घरात सुरक्षितपणे राहावे अशा सूचना देण्यात आला. वीज पडत असताना मोबाईलचा वापर टाळावा, एकत्र जवळ थांबून राहण्याऐवजी दूरवर बसून राहावे, धातूच्या वस्तू सोबत ठेवायचे टाळावे तसेच उंच झाडाच्या लगत उभे राहू नये असा सल्ला देण्यात आला.

खुल्या मैदानात असल्यास खोलगट ठिकाणी बसून राहावे तसेच पायाखाली प्लास्टिक अथवा लाकडाचे पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा असे देखील या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. टोकदार धातूची वस्तू ही वीज प्रतिबंधक यंत्र (लाईटनिग अरेस्टर) सारखे काम करत असून रस्त्याकडेला अथवा पाण्याच्या स्त्रोत्राजवळ वीज पडत असताना राहू नये असे सांगण्यात आले. वीज पडण्यापूर्वी पशुपक्षी यांना संकेत मिळत असून नागरिकांना देखील दामिनी ॲपच्या मदतीने विज पडण्याबाबतची माहिती सहजगत मिळत असून प्रशासनाकडून मिळत असलेल्या माहिती संदर्भात नागरिकांनी गांभीर्याने पालन करावे असे सुचित करण्यात आले.

नैसर्गिक आपत्ती म्हणून नोंद नाही

वीज पडून एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत केली जात असली तरीही अशा मृत्यूला नैसर्गिक आपत्ती मृत्यू असा नोंदवले जात असल्याने मृताच्या कुटुंबीय इतर शासकीय लाभांपासून वंचित राहत असतात. या दृष्टिकोनातून आवश्यक खबरदारी घेण्याचे व नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती करून विजेमुळे मृत्यू रोखण्याचे आवाहन या चर्चासत्रात करण्यात आले.