नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये कृषी संदर्भात अनेक उत्पादने तयार होत असली तरीही या कृषी मालाला अजूनही आवश्यक तितकी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झालेली नाही. यामुळे येथील कृषी माल शहरी भागात पाठवण्यात वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात होत असून नाशिवंत असणाऱ्या कृषी मालाला आवश्यक दर प्राप्त होत नाही.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण, औद्योगीकरण होत असून जिल्ह्यामध्ये नवीन राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असताना स्थानिक कृषी मालाच्या विक्रीसाठी अनुकूल वातावरण करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर येऊन ठेपली आहे. गेला काही वर्षात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रासोबत पालघर, बोईसर, डहाणू तसेच वाडा शहरांमध्ये लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
पालघर जिल्हा लगत असणारे वलसाड, सुरत, नाशिक व ठाणे शहरांमधील देखील कृषी उत्पादने विक्रीसाठी जात असतात. जिल्ह्यातील कृषी उत्पादनाला स्थानिक पातळीवर आवश्यक मागणी नसल्याने मध्यस्थ्यांच्या (दलाल) वर कृषीमालाचा स्थानिक बाजार भाव ठरत असतो. त्यामुळे शेती, बागायती करणे किफायतशीर ठरत नसून अनेकांनी आपले कृषी क्षेत्रातील लागवड बंद करून नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले आहे.
एक जिल्हा एक उत्पादन या शासनाच्या धोरणानुसार पालघर जिल्ह्याने चिकू उत्पादन व त्यावरील प्रक्रिया करण्यासाठी प्राधान्य दिले होते. चिकूच्या चकत्या, पावडर, लोणची व इतर उत्पादने बाजारात चांगल्या दराने विकली जात असली तरी जिल्हा बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून त्याची अधिकतर खरेदी केली जाते. चिकूमध्ये असणारे पौष्टिक घटक व त्याची चव पाहताना त्याचा मिष्ठान्न, बिस्किट तसेच शालेय पोषण आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.
चिकू पावडरच्या मधुर चवीचा लाभ घेऊन चिकू पावडर चा वापर काही दुर्धर आजारावरील गोळ्यांच्या उत्पादनात आवरण करण्याचे प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. अशा परिस्थितीत स्थानिकांना या फळाची उपयुक्तता समजू नये तसेच त्याला स्थानीय पाठीवर मागणी नसल्याने ऐन हंगामामध्ये हे फळ अवघ्या पाच ते १० रुपये प्रति किलो दराने विकले जाते.
चिकूवर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने शासनाने काही प्रक्रिया केंद्राला आर्थिक पाठबळ दिले असले तरी त्याचे आवश्यक फलित बागायतदार पर्यंत पोहोचले नसल्याचे दिसून येते. चिकू सह वेलची केळी, आंबा, जांभु, जांभ, पेरू, कमरक इत्यादी फळांना स्थानिक बाजारपेठेत मागणी वाढवण्यासाठी वितरण साखळी मजबुतीकरण करणे आवश्यक झाले आहे. पालघर जिल्हा एकेकाळी सुकेळी व वेलची केळ्यांसाठी प्रसिद्ध होता.
अशा केळांच्या प्रकारांवर प्रक्रिया करून पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सुकवलेले पदार्थ, लोणची, मुरंबा, वड्या व मिष्ठान्न पदार्थ उपलब्ध करून दिल्यास स्थानीय पातळीवर कृषी मालाचा वापर व उपयोग होऊ शकेल. पालघर जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असून कुपोषण निर्मूलनासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
यामध्ये डोंगरी भागात उत्पादित होणारी नाचणी (नागली) वापर उपयुक्त ठरेल असे विविध शास्त्रीय अभ्यासाच्या अहवालामध्ये दिसून आले आहे. कुपोषणग्रस्त असणाऱ्या भागामध्ये पुरवल्या जाणाऱ्या मध्यान भोजन तसेच कुपोषण निर्मूलनासाठी असणारे विशेष शिबिरांमध्ये नाचणीचा वापर अत्यल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे.
शासकीय उपक्रमांमध्ये न्याहारी मध्ये नागली बिस्कीट व इतर पदार्थांचा वापर होणे, मध्यान भोजन व इतर ठिकाणी नागली पिठाचा तसेच नागलीपासून तयार केले जाणारे पापड व इतर उत्पादनाचा वापर करणे सहज शक्य असून यासाठी शासकीय मानसिकतेत बदल आणण्याची गरज निर्माण झाली आहे. एकेकाळी लीली, शेवंती व अबोली साठी प्रसिद्ध असणाऱ्या पालघर जिल्ह्यात मोगरा व सोनचाफा ही मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे.
ही उत्पादने शहरी भागात पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे लवकर उठून या फुलांची विक्री करणे तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध करून शहरी बाजारपेठेत पोहोचवणे आव्हानात्मक ठरत असते. रेल्वे गाड्यांची मर्यादा, वेगवेगळ्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी यामुळे जिल्ह्यातील फळ बाजारपेठेत उशिरा पोहोचल्यास त्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होऊन त्याचा फटका बागायतदारांना बसत आहे.
या सुगंधी फुलांपासून सुगंधी तेल निर्माण करणे अथवा या फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या कारणांसाठी दैनंदिन वापरात आणणे सहज शक्य असून त्यासाठी आवश्यक संशोधन व विपणन (मार्केटिंग) चे पाठबळ देण्याचे गरजेचे आहे. जिल्ह्याचा विकास होत असताना किमती सुगंधी तेल जिल्ह्यात उत्पादन करण्यासाठी एकही यंत्रणा कार्यरत नाही हे अधिकारी वर्गाच्या दूरदृष्टीच्या मर्यादेचे लक्षण वाटत आहे.
सध्याच्या परिस्थिती तरुण वर्ग मद्यपानाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला असून शेजारच्या गुजरात राज्यातून अनेक पर्यटन मद्यपानासाठी जिल्ह्यातील सीमा भागातील पर्यटन केंद्राकडे येताना दिसून येतात. पालघर जिल्ह्याचा समुद्रकिनारी भाग हा एकेकाळी ताडी व माडी साठी प्रसिद्ध होता. ताडी परवाना पद्धतीमध्ये राज्य सरकारने केलेले बदल ताडी उत्पादकांना अनुकूल नसल्याने तसेच मनुष्यबळाची मर्यादा येऊ लागल्याने हा उद्योग सध्या बिकट अवस्थेमध्ये आला आहे.
एकंदरीत विविध पौष्टिक गुण असणारे या कृषी पेयामध्ये अल्कोहोलचे मर्यादित प्रमाण असून पावसानंतर उन्हाळ्यापर्यंत मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या या ताडी पासून वेगवेगळी उत्पादने तयार करण्यासाठी माजी खासदार कै. एड. चिंतामण वनगा यांनी प्रयत्न केले होते. याच धर्तीवर ताडी पासून उत्पादने तयार करून या कृषी उत्पादनाचा आस्वाद बारमाही उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना तसेच बागायतदारांना लाभ मिळू शकेल अशी परिस्थिती आहे.
जिकडे पिकचे तिकडे विकत नाही अशी संकल्पना सर्वच ठिकाणी असते. त्यामध्ये सुधारणा करून स्थानिक रहिवाशांना आपल्या भागातील उत्पादनाबद्ल गोडी निर्माण करणे, त्याचे सेवन वाढवण्यासाठी त्यामागील पौष्टिकता व इतर गुणधर्मां बाबत जागृती निर्माण करणे तसेच त्याचे मार्केटिंग करण्यासाठी व्यवस्था उभारून स्थानिक पातळीवरील उत्पादनाला सदैव चांगला दर मिळेल यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
