पालघर : लोकसभा व विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील या अनुषंगाने सुरू असणारी मतदार नोंदणी काही प्रमाणात कमी झाली आहे. पालघर लोकसभा क्षेत्रात ९ फेब्रुवारी रोजी २४ लाख ११ हजार ३०५ मतदार संख्या असून गेल्या तीन महिन्यात मतदार वाढीचे प्रमाण प्रति महिना अवघे २८०० इतकेच राहिले आहे.

विधानसभा २०२४ च्या निवडणुकीच्या वेळी पालघर जिल्ह्यात २२.९२ लाख मतदार पात्र ठरले होते. त्यानंतर आठ महिन्यांनी एक जुलै रोजी लोकसभा क्षेत्रातील मतदार संख्या २३.९० लाख मतदारांपर्यंत पोचली होती. या आठ महिन्याच्या कालावधीत दरमहा १२ हजार पेक्षा अधिक वेगाने जिल्ह्यात मतदान नोंदणी झाल्याचे दिसून आले.

त्यानंतर चार महिन्याच्या कालावधीत ३१ ऑक्टोबर रोजी पालघरची मतदार संख्या २४.०२ झाली होती. दरम्यान चार महिन्याच्या कालावधीत मतदार वाढीचा दर ३१०० च्या जवळपास प्रति महिना इतका राहिला होता. नंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र जिल्ह्यात फक्त ८९७७ इतकेच मतदार वाढले असून दरमहा वाढणाऱ्या मतदारांची संख्या २८०० च्या जवळपास मर्यादित राहिली आहे.

सद्यस्थितीत पालघर लोकसभा क्षेत्रात १२ लक्ष ४४ हजार ०४९ पुरुष, ११ लक्ष ६७ हजार ०१५ महिला व २४१ तृतीयपंथी मतदार आहेत. नालासोपारा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ६.६१ लक्ष मतदार नोंदवण्यात आले असून बोईसर विधानसभा क्षेत्रात ४.४० मतदार आहेत. वसई विधानसभा क्षेत्रात ३.६४ लाख मतदार, विक्रमगड मतदार संघात ३.२५ लाख मतदार, डहाणू विधानसभा क्षेत्रात ३.१४ लाख मतदार तर पालघर विधानसभा क्षेत्रात ३.०६ मतदार नोंदवण्यात आले आहेत.

नवीन मतदार नोंदणी बाबत सावधगिरी

पालघर लोकसभा क्षेत्रातील नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदार संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनास आले होते. गजबजलेल्या लोकवस्तीमध्ये अनेकदा मतदारांचे पत्ते मोगम असल्याने त्यांची पडताळणी करणे कठीण होत असे. ही बाब लोकसत्ता सह काही राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासना निदर्शनास आणून दिल्यानंतर नव्या मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची कटाक्षाने छाननी करण्याची योजना राबवण्यात आली.

मतदानकेंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्राप्त झाल्यानंतर या अर्जाची योग्य पद्धतीने छाननी करणे, प्रत्यक्षात गृह भेटी देणे, नवीन मतदार नोंदणी बाबत माहिती संबंधित मतदान केंद्रावर व तहसील कार्यालयात नोटीस फलकावर झळकावून आक्षेप मागविणे, आवश्यकता भासल्यास कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्षात सुनावणी घेण्याची प्रक्रिया कटाक्षाने राबविण्यात आली. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन या दोन विधानसभा क्षेत्रातील बीएलओ यांना सतर्क करण्यात आले होते. याचा परिणाम मतदार दर वाढ घटनेमध्ये झाल्याचे दिसून आले आहेत.

राज्यात मतदार यादी चे पुनर् निरीक्षण करण्याचा व्यापक कार्यक्रम एप्रिल महिन्यात हाती घेण्याचे नियोजित होते. मात्र या सुमारास जनगणना कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याने मतदार यादी चे पुनर निरीक्षण कार्यक्रम लांबणीवर पडण्यची शक्यता आहे.