पालघर : राज्य सरकारने राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ४५ शिबिरांमध्ये ४८ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. अकृषिक सुधारण्यानुसार या अभियानादरम्यान २.१३ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून विविध प्रकारचे २० हजार पेक्षा अधिक दाखले देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत पालघर तालुक्यात १०, वसई व डहाणू तालुक्यात प्रत्येकी नऊ, वाडा तालुक्यात सात, विक्रमगड व जव्हार तालुक्यात प्रत्येकी तीन तर मोखाडा व तलासरी तालुक्यात प्रत्येकी दोन असे महसूल मंडळनिहाय ४५ शिबिरांचे आयोजन ७ मार्च ते १५ मे दरम्यान करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांना महसूल मंडळाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या दाखल्यांची व अर्जांची पूर्तता करता आली.
या अभियानाअंतर्गत १५ हजार ५५३ नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यात आला असून ४७९५ नागरिकांना ८-अ उताऱ्यांची प्रत देण्यात आली. या अभियानांतर्गत ८८१५ विविध प्रकारचे प्रमाणपत्र तसेच ३६९६ विद्यार्थ्यांना शाळात तिथे दाखला उपलब्ध करून देण्यात आला. या अभियानादरम्यान एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत ३१४९ अर्ज निकाली काढण्यात आले असून भोगवटा वर्ग २ खातेदारांचे भोगवटा वर्ग १ मध्ये रूपांतरीत केलेल्या प्रकरणाची संख्या २१०० इतकी असून ११४४ शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनीची ऍग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया या अभियानादरम्यान करण्यात आली.
याच बरोबरीने सामाजिक अर्थसहाय्य योजनेतून ९६५ नागरिकांना लाभ मिळाला असून या योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले ९१६ नागरिक लाभधारक ठरले. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील १२८७ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची इ केवायसी पूर्ण करण्यात आली असून आपले सरकार व पीजी पोर्टलवरील ८८६ प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यात आले. याच बरोबरीने ५६४ नागरिकांना वन हक्क मोजणी नकाशांचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
या अभियानामुळे अनेक नागरिकाला वैयक्तिक पातळीवरील दाखले सहजपणे उपलब्ध झाल्याने विविध शिबिरांमध्ये त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
