पालघर : पालघर, माहीम, केळवे, सफाळे या वर्दळीच्या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण नूतनीकरण तसेच काँक्रीट करण्याचे काम टप्प्याटप्प्यात घेतली असून कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून ट्रॅफिक वॉर्डन ची व्यवस्था तसेच वाहतुकी संदर्भात नियोजन न केल्याने माहीम – रेवाळे परिसरात तुफान वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडून संबंधित ठेकेदाराला यासंदर्भात सूचना देण्यात आल्यानंतर देखील ठेकेदारांनी या सूचना कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचे दिसून येत आहे.

डहाणू पारनाका येथून सफाळे वरई नाका दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, दुरुस्ती, काँक्रिटीकरण या कामांसाठी १० वर्षाच्या देखभाल दुरुस्ती कामासह एकूण १७५ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. पालघर ते माहीम दरम्यान रस्त्याच्या दुरुस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून काही ठिकाणी खोदकाम करून तर काही ठिकाणी खडी माती टाकून नंतर डांबरीकरण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ता खराब होतो अशा ठिकाणी काँक्रीट करण्याचे पट्टे देखील हाती घेण्यात आले आहे.

सद्यस्थिती माहीम बाजार ते रेवाळे दरम्यान काँक्रीट करण्याचे काम सुरू असून पिंपळ बाजार ते रेवाळे दरम्यान एक दिशा मार्ग करण्याचे योजिण्यात आले होते. मात्र एक दिशा मार्गीकीचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूला दर्शवण्यात आल्याने या अरुंद रस्त्यावर वाहने समोरासमोरून येऊन वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे.

माहीम पेट्रोल पंप परिसरात ३० ते ५० मिटर लांबीच्या काँक्रिटीकरणाचे काम दोन सलग पट्ट्यांमध्ये एकामार्गिकेवर सुरू असून त्यामुळे या पट्ट्यातून फक्त एकच प्रवास करू शकत आहे. अशावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था करणे अपेक्षित असताना त्याच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे अनुभवण्यात येत आहे.

सध्या बुलेट ट्रेन च्या कामासाठी अवजड वाहने या मार्गावरून जात असून केळवे येथील यात्रेच्या निमित्ताने या मार्गीके वरील वाहतूक वाढली आहे, शिवाय या मार्गा वरून कर्मचारी, विद्यार्थी व बागायतदार प्रवास करत असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.

वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना नेमण्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या असून त्याची ठोस अंमलबजावणी होत नसल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल. एक दिशा मार्ग प्रभावीपणे वापरण्यासाठी तातडीने उपाय योजना आखण्यात येतील. – पोपट चव्हाण, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर.