पालघर : पालघर जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) रुग्णांचे प्रमाण कमी होत असले तरी जिल्ह्यातून हिवतापाला हद्दपार करण्याचा दृष्टीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग तसेच हिवताप विभाग प्रयत्नशील आहे. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून लोकसहभाग वाढविणे, स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय प्रभावीपणे साधने या दृटीने जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. याचे औचत्य साधून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य संस्थांमध्ये याविषयी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आरोग्य विभागाचे तसेच हिवताप विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्ह्यात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याला ग्रामीण भागात ३०- ३५ हजार तर शहरी भागांमध्ये २०- २५ हजार रक्त तपासण्या केल्या जात असूनपावसाळा व्यतिरिक्त इतर महिन्यात बहुतांश वेळी रुग्णांची संख्या एकेरी आकड्यात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मलेरियाचा उद्रेक होण्याचा एक प्रसंग वगळता गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील हिवताप रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्हा बाहेरून स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांमध्ये व विशेषतः बांधकाम कर्मचाऱ्यांमध्ये वायवॅक्स पद्धतीचे मलेरिया रुग्ण प्रामुख्याने आढळत असून हिवतापाचे जिल्ह्यात निर्मूलन करण्याच्या दृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हिवतापाविषयी जनजागृती व तसेच तपासणी करण्यासाठी जून महिन्यात विशेष पथकाची उभारणी करण्यात येत असून नागरिकांना हिवतापाची लक्षणे, औषधोपचार व हिवताप रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेच्या उपाययोजना यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. एकीकडे जिल्ह्यात डेंगू चे रुग्ण वाढत असताना हिवतापावर नियंत्रण मिळवण्यास जिल्हा आरोग्य विभागाला यश लाभल्याचे दिसून आले आहे.

विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा करण्यासाठी जागृती उपक्रम

रिलीफ हॉस्पिटल च्या डॉ. विशाल कोडागिकर यांच्या पुढाकाराने पालघर येथील सुंदरम स्कूल व बोईसर येथील चिन्मया विद्यालय या शाळांमधील सुकते १५०० विद्यार्थांना जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून या आजाराबद्दल जागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आजाराविषयी ची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात माहिती देण्यासोबत या विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या माध्यमातून मलेरिया योद्धा बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

अशा विद्यार्थ्यांनी या कीटकजन्य रोगाच्या नियंत्रण आपल्या कुटुंबीयांना सोबत घेऊन परिसरात पाणी साचणार नाही याकडे दक्षता घ्यावी तसेच डास निर्मूलनाच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने पुढाकार घ्यावा असे सुचित करण्यात आले. राज्य व देशपातळीवर असणाऱ्या मलेरिया रुग्णांची संख्या व इतर तपशील देऊन हिवतापाला हद्दपार करण्याच्य दृष्टीने विद्यार्थ्यांचे त्यांचा कुटुंबासमवेत योगदान महत्वपूर्ण ठरणार असल्या कडे बिंबवण्यात आले.

पालघर जिल्ह्यात मलेरियाची परिस्थिती तुलनेने नियंत्रणात असली तरी आदिवासी व दुर्गम भागांमध्ये डासजन्य आजारांचा धोका कायम आहे. तसेच जिल्ह्यात परराज्यातून येणारे मजूर यांचे प्रमाण खूप आहे व त्या मुळे परराज्यातून जिल्ह्यात प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मलेरिया निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ताप सर्वेक्षण, रक्त तपासणी, त्वरित उपचार, घराभोवती फवारणी आणि जनजागृती यामुळे रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

पावसाळ्यात साचलेले पाणी, अपुरी स्वच्छता आणि दुर्गम वस्तीमुळे मलेरियाचा प्रसार वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी डास प्रतिबंधक उपाय काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा “लवकर निदान व त्वरित उपचार” या तत्त्वावर काम करत असून मलेरिया मुक्त पालघरसाठी लोकसहभाग व स्थानिक स्वराज्य संस्थाच सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.