बोईसर : पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस स्टेशन हद्दीतील नानिवली गावात शुक्रवारी पहाटे धक्कादायक आणि विचित्र प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

नानिवली येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. या घटनेचा उलगडा करण्यात उलगडा करण्यात मनोर पोलिसांना यश आले आहे. भरधाव वेगात असलेली दुचाकी विद्युत खांबाला धडकून त्या नंतर झाडावर आदळली . या अपघातात वैभव लहांगे (१५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अपघातामध्ये जखमी झालेल्या नितीन वरठा याने जवळच असलेल्या वाडीतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला. दुचाकी अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून लग्न समारंभातून घरी परतत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील दुचाकी प्रथम विद्युत खांब आणि त्यानंतर झाडावर आदळली .

अपघातात मित्राचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतात जखमी नितीन वरठा याने देखील शेजारील वाडीमध्ये असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या वृत्ताला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी दुजोरा दिला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, मनोर पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने नानीवली येथे पोहोचून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.