पालघर : पालघर येथे जिल्हा मुख्यालय स्थापन झाल्यानंतर शहराकडे येणाऱ्या वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पालघर- त्र्यंबकेश्वर- घोटी या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला गेल्यानंतर देखील या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत तसेच देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे.

पालघर- मनोर या दरम्यान विशेषत: पालघर ते मासवण- बहाडोली नाका दरम्यानच्या वाहनांच्या रांगा लागताना दिसून येतात. पालघर-त्र्यंबकेश्वर-घोटी राष्ट्रीय महामार्गाचा हा भाग असला तरी यादरम्यानचा रस्ता अजूनही दुपदरी राहिला आहे. अवजड वाहनांच्या मागे धीम्यागतीने प्रवास करताना पुढे जाण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात घडल्याचे अलीकडच्या काळात दिसून आले आहे.  वाघोबा घाटातील तीन किलोमीटर अंतरातील डांबरीकरण खराब झालेले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत सदरचे डांबरीकरण अगदी पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते.

हे काम पहिल्या पावसाळ्यात खराब झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने सदरचे काम दोष दायित्व कालावधीत ठेकेदाराकडून पुनस्र्थापित करणे गरजेचे आहे,  अशी मागणी नागरिक करीत आहेत. याच मार्गावर मासवण येथील सूर्या नदीवर उभारण्यात आलेल्या काटकोन  वळणामुळे पुलाच्या हा भाग धोकादायक झाला आहे. या ठिकाणी गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून यात अनेकांचे प्राणही गेले आहेत.  पालघर येथे जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर पालघरला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्यानंतर  रस्त्याचे रुंदीकरण  तसेच रस्त्याची देखभाल- दुरुस्ती करण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असून हा मार्ग धोकादायक झाला आहे.

पालघर-मनोर रस्त्याचे दोष दायित्व कालावधीमधील कामे तातडीने हाती घेण्यात येतील.   देखभाल दुरुतीचा ठेका देण्यात आला आहे.   दुरुस्तीची कामे अजून सुरूका झाली नाहीत याची चौकशी केली जाईल.

दिनेश महाजन, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण