पालघर : जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांमार्फत विविध उपक्रम राबविले जात असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी ते उपयुक्त ठरत आहेत. पालघर तालुक्यातील शिरगाव येथे भरविण्यात येणाऱ्या ग्लोबल कोकण महोत्सवात महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या उत्पादनाचे विक्री व प्रदर्शन असणारे मिनी सरस हे या अभियानाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे
उमेद तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या विद्यमाने “पालघर मिनी सरस २०२६” अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन शिरगाव बीच, पालघर येथे १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत करण्यात आले आहे.
ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा व कौशल्याचा उत्सव ठरणाऱ्या या मेळाव्यात स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, ग्रामीण हस्तकला, कलाकुसरीच्या वस्तू, वारली पेंटिंग, कापडी पिशव्या तसेच अन्य हस्तनिर्मित उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहेत. स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांना उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनामध्ये पालघर जिल्ह्यातील ७३, रत्नागिरी १२, ठाणे सात, रायगड पाच, पुणे दोन तसेच नाशिक, जळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा एकूण १०२ स्वयंसहायता समूहांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये साधारणपणे ८० स्टॉल हस्तकला व इतर उत्पादनांचे तर २० स्टॉल खाद्यपदार्थ विक्रीचे असणार आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष व आरोग्य कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मागील दोन वर्षांत आयोजित करण्यात आलेल्या अशा प्रदर्शनांमध्ये दरवर्षी साधारणतः १५ ते २० लाख रुपयांची विक्री झाली असून सुमारे १० ते २० हजार नागरिकांनी भेट दिली होती. यावर्षी हा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन उपक्रम ग्लोबल कोकण महोत्सवासोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येत असून या महोत्सवाला मुंबई व परिसरात मोठी ओळख आहे. दरवर्षी साधारणतः एक ते दोन लाख नागरिक या ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट देत असल्याने यावर्षी महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्याची तसेच महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या उत्पादनांना स्वतःचा ग्राहकवर्ग निर्माण करण्याची संधी उपलब्ध होणार असून पुढील काळात विविध व्यक्ती व संस्थांकडून वर्षभर ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे.
स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे शासनाचे महत्त्वाचे ध्येय असून प्रदर्शनाच्या उद्घाटनास आता अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे नागरिकांनी १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिरगाव बीच, पालघर येथे कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची खरेदी करून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पालघर डॉ. इंदु राणी जाखड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.
