डहाणू : पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आल्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेची दखल घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय पातळीवर तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि आमदार रोहित पवार बुधवार ६ मे रोजी पीडित कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पालघर पोलिस अधीक्षकांना कठोर कारवाईच्या सक्त सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, या गुन्ह्यात पोक्सो कायद्यासोबतच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील गंभीर कलमे लावण्यात यावीत. याशिवाय उपअधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास पूर्ण करावा, भक्कम दोषारोपपत्र तयार करावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि विशेष सरकारी वकील नियुक्त करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना तातडीने पोलीस संरक्षण, वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन आणि मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला असून, सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. प्रकरणाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी त्या बुधवारी दुपारी २.०० वाजता कासा उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील उपस्थित राहणार आहेत.

याच घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार रोहित पवार हेसुद्धा बुधवारी सकाळी १०.३० वाजता कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे जिल्हा प्रभारी तथा माजी आमदार सुनील भुसारा यांनी ही माहिती दिली असून पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे.

अलिकडच्या काळात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत आणि त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांबाबत समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये अंधश्रद्धेचा आधार घेऊन महिला व बालकांचे शोषण होण्याच्या घटना समोर येत आहेत. बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे व त्यांची जलद अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालघरमधील या घटनेचा तपास आणि लोकप्रतिनिधींची भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.