पालघर : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात लागवडीच्या आधुनिक आणि प्रगत पद्धतींची ओळख करून देण्यासाठी आयोजित प्रक्षेत्र भेटीमध्ये शेतकऱ्यांना भात लागवडीच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक उत्पादन देणाऱ्या आणि श्रम कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यावेळी भात लागवडीच्या विविध पद्धती, लावणी यंत्राचा वापर आणि ट्रे भात रोपवाटिका तंत्रज्ञान याची शेतकऱ्यांनी माहिती घेतली.

कोसबाड येथे कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषि विभाग डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै रोजी कृषी दोन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी अनिल नलगुरुवार, कृषि अधिकारी धर्मेंद्र ठाकूर, कृषि भूषण यज्ञेश सावे, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त रूपाली बाबरेकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव तसेच कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

भारत हा कृषिप्रधान देश असून शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन आहे. त्यासाठी पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टीने शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल असे प्रतिपादन तालुका कृषि अधिकारी अनिल नलगुरुवार यांनी यावेळी केले. कृषि विज्ञान केंद्राच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढून येथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे सुचवून शासनाच्या कृषी विषयक विविध योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.

कृषि विज्ञान केंद्रावरील प्रक्षेत्र भेटीमध्ये भात लागवडीच्या विविध पद्धतींची, लावणी यंत्राची आणि ट्रे भात रोपवाटिका याबाबतची माहिती शास्त्रज्ञ भरत कुशारे आणि प्रशांत वरठा यांनी दिली. दरम्यान वेती गावातील भाजीपाला उत्पादक शेतकरी अनंता पागी आणि वाणगाव येथील सेंद्रीय पद्धतीने शेती करणारे अनिल पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रे रोपवाटिकेचा फायदा

ट्रे भात रोपवाटिका तंत्रात विशिष्ट ट्रेमध्ये भाताची रोपे तयार केली जातात, जी नंतर लावणी यंत्राद्वारे वापरली जातात. यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते, रोपे निरोगी राहतात आणि लावणीसाठी सोयीस्कर ठरतात. या पद्धतीमुळे रोपांचे नुकसान कमी होते आणि पुनर्लागवडीचा धक्का रोपांना लागत नाही. त्यानंतर लावणी यंत्राचा वापर करून कमी वेळेत आणि एकसारख्या अंतरावर लावणी करता येते. या यंत्रामुळे मजुरीवरील खर्च कमी होतो आणि वेळेची बचत होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पिकांसाठी अधिक वेळ मिळतो.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • शेती करताना उत्पादन खर्च कमी होण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यावर भर दिल्यास किफायतशीर शेती करता येते.
  • कमी बियाणे वापरून, योग्य अंतरावर रोपे लावून आणि पाण्याचे नियोजन करून अधिक उत्पादन कसे मिळवता येते
  • शेतमालाचे मार्केटिंग कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. मार्केटिंग साठी महामार्गावर निवडक ठिकाणी मंडी स्थापन झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.
  • महिलांना सोबत घेऊन गट शेतीच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला प्रक्रिया उपक्रम यशस्वीपणे राबवत असल्याची माहिती दिली.
  • प्रत्येक शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
  • बदलत्या हवामानानुसार शेती पद्धत स्वीकारली पाहिजे असे सांगून शासनाने शेतमालाला चांगला भाव द्यावा यासाठी प्रयत्न करावेत असे सुचविले.