बोईसर : पालघर जिल्ह्यात संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी १०८ टक्के पावसाची नोंद झाली. जुलै महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस नोंदला गेला तर जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तुटीचा पाऊस झाला. जून ते सप्टेंबर या काळात पावसाचे स्वरूप असमान राहिल्यामुळे डोंगराळ भागातील खरीप पीके धोक्यात आली असून जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

पालघर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामाच्या चार महिन्यात सरासरी २३०५ मिमी पाऊस पडतो.मात्र यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक २४९६ मिमी (१०८.३ टक्के) पावसाची नोंद झाली. कोकण विभागात सरासरी ९०.४ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पालघर जिल्ह्यात पाऊस पडला. जुलै महिन्यात सर्वात जास्त १७६०.४ मिमी (१९४.५ टक्के) म्हणजे सरासरीच्या जवळपास दुप्पट पावसाची नोंद झाली. जून महिन्यात २२७.४ मिमी (५५.२ टक्के), ऑगस्ट ३१९ मिमी (४७.६ टक्के) आणि सप्टेंबर महिन्यात १८९.२ मिमी (५९.३ टक्के) पावसाची नोंद झाली. जुलै या एकाच महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चार महिन्यांची सरासरी गाठण्यास मदत झाली. आठ तालुक्यांपैकी चार तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली तर उर्वरित चार तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. तलासरी तालुक्यात सर्वाधिक १४६.६ टक्के तर जव्हार तालुक्यात सर्वात कमी ७५.९ टक्के पाऊस झाला.

असमान पावसाने शेतीच्या नुकसानीची भीती :

सन २०२६ च्या खरीप हंगामा जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अति मुसळधार पावसामुळे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. नदी काठावरील अनेक भागांमध्ये शेतातील उभी पिके, पेरलेले बियाणे, माती वाहून गेले. अनेक शेतजमिनी दीर्घकाळ पुराच्या पाण्याखाली राहिल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी आवश्यक कालावधीच मिळाला नाही. अतिवृष्टीमुळे शेतीचे प्राथमिक नुकसान झाल्यानंतर दुबार पेरणीची संधी न मिळाल्यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले. तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून भाताची रोपे अजून पोटरीत आलेली नाहीत. पावसाच्या दडीमुळे शेत जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने भात पीक करपून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उर्वरित जमिनीतील भात पीक दाणे भरण्याच्या स्थितीत आले आहे. पण गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असली तरी पावसाचे प्रमाण असमान होते. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने पावसाअभावी कोरडे गेले असून त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड या डोंगराळ तालुक्यातील भात शेती नागली, वरी सारखी पिके धोक्यात आली आहे. या डोंगराळ भागात सिंचनाच्या फारश्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकरी फक्त खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असतो.  बहुतेक सर्व परीसर उंच सखल टेकड्यांचा असून अल्पभूधारक असलेला शेतकरी  भात, वरी, नागली, उडीद सारख्या पिकांची लागवड करून त्यामधून येणार्‍या उत्पन्नावर वर्षभर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असतो. डोंगर उतारावर पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शेतजमीन लवकर कोरडी होऊन लागवड केलेली पिके कर पण वाया जाण्याची भीती असते.

मान्सून हंगामातील तालुका निहाय सरासरी पाऊस :

वसई : २३९६.७ मिमी (८८.७)
वाडा : २६५१.९ मिमी (१०१.६)
डहाणू : २४९७.० मिमी (१३१.४)
पालघर : २६०६.३ मिमी (१०७.२)
जव्हार : २०५६.२ मिमी (७५.९)
मोखाडा : १९९६.२ मिमी (८८.१)
तलासरी : ३१२४.९ मिमी (१४६.६)
विक्रमगड : २४८१.८ मिमी (९६.४)