पालघर : पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील आणि परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. या संदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांना तीन स्वतंत्र पत्रे दिली असून त्यामध्ये वसई रोड / पालघर मार्गे मुंबई ते हावडा व मुंबई -वसई-पालघर-दरभंगा दरम्यान दोन नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
वसई रोड / पालघर मार्गे मुंबई ते हावडा नवीन एक्सप्रेस गाडी – भाईंदर, वसई रोड, पालघर, बोईसर ते वलसाड या पट्ट्यात राहणारे अनेक प्रवासी मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नियमित प्रवास करतात. सध्या या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी मुंबईला (मुख्य स्थानकांवर) जावे लागते, ज्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांची मोठी गैरसोय होते.
त्यामुळे प्रवाशांची सोय करण्यासाठी मुंबई (पश्चिम रेल्वे) येथून वसई रोड, पालघर,वापी, वलसाड आणि नंदुरबार मार्गे हावडा (Howrah) पर्यंत एक नवीन लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.मुंबई -वसई-पालघर-दरभंगा दरम्यान दोन नवीन रेल्वेगाड्या: मुंबई महानगर क्षेत्र, विशेषतः मुंबई/वसई / पालघर येथून बिहारमधील दरभंगा आणि आसपासच्या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागतो. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि प्रवास अधिक सुकर करण्यासाठी या मार्गावर किमान दोन नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी खासदार सवरा यांनी केली आहे.त्याचबरोबरीने डहाणू रोड येथे गाड्यांना थांबा देणे आणि वसई मार्गे नवीन गाड्या सुरू करणे यावर भर देण्यात आला आहे.
डहाणू रोड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा: डहाणू रोड हे डहाणू, वाणगाव, बोईसर, बोर्डी, घोलवड, उंबरगाव, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड येथील मोठ्या लोकसंख्येसाठी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. डहाणूपासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर प्रस्तावित असलेल्या वाढवण बंदरामुळे येत्या काही वर्षांत या भागात प्रवाशांची वर्दळ लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे.
याचा विचार करून खालील तीन गाड्यांना डहाणू रोड स्थानकावर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. २२९४३/२२९४४ दौंड-इंदौर एक्सप्रेस (वसई रोड मार्गे). १२४७१/१२४७२ वांद्रे टर्मिनस-जम्मू तवी स्वराज्य एक्सप्रेस (बोरिवली मार्गे). १२४७९/१२४८० वांद्रे टर्मिनस-जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (बोरिवली मार्गे).
या सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून जनहिताच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
