पालघर : पालघर महावितरण विभागात चार लाख दोन हजार ग्राहक असून त्यांच्यापैकी एक लाख ७० हजार ग्राहकांच्या विद्युत जोडणी ला स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. औद्योगिक विद्युत जोडणी असणाऱ्या ग्राहकांना जानेवारी अखेरीपर्यंत स्मार्ट मीटर बसवण्याचे उद्दिष्ट महावितरण पालघर विभागाने समोर ठेवले आहे.
जिल्ह्यातील महावितरण ग्राहकांमध्ये निवासी, वाणिज्य, औद्योगिक, उच्च दाब, शासकीय कार्यालय व इतर प्रकारचे ग्राहक असून पालघर विभागातील एक लाख दहा हजार घरगुती ग्राहकांच्या जोडणीला स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे. महावितरण कंपनीच्या ८६ कार्यालयासह ४७६३ शासकीय कार्यालयांमध्ये देखील स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी मीटर बंद आहेत, वीज वापर अधिक आहे, सरासरी पद्धतीने मीटर रीडिंग घेतले जाते, वीज चोरीचे संभाव्य प्रकार घडत आहेत अशा ठिकाणी महावितरण ने यापूर्वी स्मार्ट मीटर बसवण्याचे त्रयस्थ संस्थेद्वारे काम हाती घेतले होते. आजवर सुमारे ४२ टक्के ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले असून उर्वरित ठिकाणी जलद गतीने मीटर बदलण्यासाठी महावितरण प्रयत्नशील राहणार आहे.
पालघर महावितरण विभागात ६३०० औद्योगिक ग्राहक असन ४००० ग्राहकांचे जोडणीला स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. उर्वरित औद्योगिक ग्राहकांना जानेवारी अखेरीपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संबंधित औद्योगिक जोडणी असणाऱ्या लाईनमन व त्यांच्या सहाय्यकांवर मीटर जोडणीचे जबाबदारी सोपवण्यात आली असून नियमित वेगवान दुरुस्तीची काम आठवण लाईन मन मीटर बदलण्याचे काम करत आहेत.
जिल्ह्यात सुमारे ३२ हजार वाणिज्य वीज ग्राहक असून त्यापैकी अवघ्या १७००- १८०० ग्राहकांच्या वीज मीटरची बदली स्मार्ट मीटर मध्ये करण्यात आली आहे. या ग्राहकांचे देखील स्मार्ट मीटर बदलण्यासाठी अग्रक्रम दिला जाणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील भारांबे यांनी लोकसत्ताला सांगितली.
अवास्तव देयकांसंदर्भात तक्रारी नगरण्य
थंडीच्या महिन्यात पालघर महावितरण विभागात सरासरी ६५ कोटी रुपयांची लघु दाबाची विद्युत बिल (डिमांड) काढली जात असत. गेल्या वर्षभरात सुमारे २० हजार ग्राहक संख्या वाढली असताना देखील डिसेंबर महिन्यातील वीज बिलाची मागणी ७० कोटी रुपयांच्या जवळपास राहिल्या कडे लक्ष महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे विज बिल अधिक रकमेची येतात असे म्हणणे संयुक्तिक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले
अवास्तव बिल आल्यास तात्काळ दुरुस्ती
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पूर्वीच्या तुलनेत अवास्तव बिल आल्यास संबंधित ग्राहकाने महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यास त्यांचे चेक रीडिंग घेऊन बिलामध्ये चूक असल्यास त्याची दुरुस्ती करून द्यायच्या सूचना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. पूर्वीप्रमाणे याकरिता बिलाची पूर्ण रक्कम भरणे अनिवार्य नसून ग्राहकाच्या समक्ष टेस्ट रीडिंग या बाबी सोडवण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय मीटर रीडिंग घ्यायचे काम नियमितपणे सुरू असून त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत अनेक ठिकाणी येणाऱ्या सरासरी वीज बिलांचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

