पालघर : पालघर रेल्वे स्थानकालगत असलेली पालघर नगर परिषदेची जुनी इमारत आता पूर्णपणे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आली असून, या परिसरामध्ये सर्व प्रकारचा व्यवसाय आणि नागरिकांची ये-जा करण्यास प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. तसेच ही इमारत पुढील आठवड्यात निष्कासित करण्यात येणार असल्याचे देखील नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या २७ जून रोजी या इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर, संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी नगर परिषदेने हे कठोर पाऊल उचलले आहे. नगर परिषदेने जारी केलेल्या अधिकृत आदेशात स्पष्ट केले आहे की, ‘महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९६५’च्या कलम १९५ (३) नुसार ही वास्तू आता कोणत्याही कारणासाठी वापरण्यायोग्य नाही. इमारत अत्यंत जीर्ण आणि पडक्या स्थितीत असल्याने ती कधीही कोसळू शकते. प्रशासनाने स्पष्ट बजावले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करून तिथे कोणीही आढळल्यास, त्याची संपूर्ण कायदेशीर व नैतिक जबाबदारी संबंधित व्यापारी आणि गाळेधारकांचीच असेल.

प्रशासनाचा पाठपुरावा व विनंती

नगर परिषदेने इमारतीतील गाळेधारक व व्यापाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या असून त्यांना वेळोवेळी नोटिसा व लिखित सूचना दिल्या आहेत. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन गाळेधारकांशी चर्चा केली आहे. तरीही गाळे रिकामे न केल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. इमारत बंदिस्त केल्यानंतर या भागातील गाळेधारक व व्यापारांनी प्रशासनाची भेट घेऊन पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

कारवाईची तयारी आणि निष्कासन

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येणार आहे. नगर परिषदेकडून ही इमारत पुढील आठवड्यात रिकामी करून निष्कासित (पाडकाम) करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आता कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे नगर परिषदे कडून जाहीर करण्यात आले आहे.

पावसाळ्यामुळे वाढला धोका

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या इमारतीचा सांगाडा अधिक कमकुवत झाला आहे. केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते, हे लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे गांभीर्य ओळखून या परिसरातून ये-जा करणे पूर्णपणे बंद करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

इमारत अत्यंत धोकादायक असल्याने या परिसरात ये-जा करणे टाळावे आणि स्वतःचे व कुटुंबाचे प्राण वाचवण्यासाठी सहकार्य करावे. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी गाळेधारकांनी व व्यापाऱ्यांनी तातडीने स्थलांतर करावे. लवकरच ही इमारत जमीनदोस्त करण्यात येईल. – प्रशांत जाधव, मुख्याधिकारी