पालघर : पालघर नगर परिषदेने कचरा उचलण्याचा तीन वर्ष कालावधीसाठी सुधारित ठेका दिल्यानंतर तब्बल अडीच वर्षाच्या कालावधीनंतर सर्वसामान्य नागरिकांना तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नगरपरिषदेने कचरा ठेका उचलून त्याचे वर्गीकरण करण्याबाबत काढलेल्या ठेक्यात व त्या अनुषंगाने केलेल्या करारनाम्यात ही बाब नमूद असताना तत्कालीन कौन्सिल व नंतर नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

पालघर नगर परिषदेने कचरा उचलण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून असलेल्या ठेक्याला मुदतवाढ दिली होती. मात्र शहरातील वाढलेली लोकसंख्या व दरांचा विचार करून नगरपरिषदेने मे २०२३ मध्ये वाढीव किमतीचा कचरा उचलणे व त्याचे वर्गीकरण करण्यासंदर्भात ठेका दिला होता. या ठेक्यांमध्ये तक्रार निवारणासाठी सर्वसामान्य नागरिकांना संपर्क क्रमांक उपलब्ध करणे तसेच २४ तास सुरू असणारे तक्रार निवारण कक्ष उभारण्याबाबत सहमती दर्शवली होती. कचरा उचलण्याच्या ठेक्यासाठी पालघर नगरपरिषद आरंभी दार महिन्याल सुमारे ५० लाख रुपये आणि किमान वेतनात वाढ झाल्याने सध्या या कामी सुमारे ५८ लाख रुपयांच्या खर्च होत आहे.

असे करताना तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक व संबंधित अधिकाऱ्यांची नाव प्रत्येक घंटागाडीवर तसेच नगरपरिषद कार्यालय व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे बंधनकारक होते. मात्र कार्यकाळ संपत असल्याने नगरपरिषद कौन्सिल सदस्यांनी व त्यानंतर प्रशासक व आरोग्य विभागाने या महत्त्वाच्या अटीकडे दुर्लक्ष केले होते.

पालघरची धुरा उत्तम घरत यांनी जानेवारी महिन्यात स्वीकारल्यानंतर यासंदर्भात नागरिकांनी लक्ष वेधले असता आरोग्य विभागाला तक्रार निवारण कक्षाचे संपर्क क्रमांक तातडीने उपलब्ध करून देण्याचे सुचित केले. मात्र संबंधित ठेकेदार गाड्यांवर हे क्रमांक चिकटवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने नगरपरिषदेने पुढाकार घेऊन संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक घंटागाड्यांवर व शहरात महत्त्वाच्या ठिकाणी झळकवले आहेत. शहरातील कचरा उचलल्या संदर्भात पूर्व व पश्चिम विभागासाठी काढण्यात आलेल्या दोन निविदांचा कालावधी एप्रिल २०२६ अखेरीस संपत असून संबंधित ठेकेदाराने करारनामा मधील अटीशर्तींची केलेली पूर्तता ही आता दिखाव्यापूर्ती राहिली आहे.

उद्घोषणा यंत्र अजूनही बंद

घंटागाडीला क्षेत्रनिहाय मार्ग निश्चित करण्यात आला असून नागरिकांना घंटागाडीच्या त्या क्षेत्रामध्ये प्रवेशाबाबत सतर्क करण्यासाठी तसेच स्वच्छतेबाबत संदेश व महत्त्वाच्या उद्घोषणा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाऊड स्पीकर बसवणे आवश्यक होते. पालघर शहरात असणाऱ्या सर्व घंटा गाड्यांवर लाऊड स्पीकर बसविण्यात आले असले तरीही ते कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे

नगरपरिषद आरोग्य विभाग तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक: ९९२२७१७९४३

कचरा उचलण्या संदर्भात पालघरच्या नागरिकांना तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण कक्ष कडे त्या नोंदविण्यात याव्यात .- उत्तम घरत, नगराध्यक्ष