पालघर: एकीकडे पालघर नगर परिषद शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी विविध मोहिमा राबवत असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे नगर परिषदेच्या मुख्य इमारतीबाहेरच नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरील आणि मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबांवर अनधिकृत फलक बेकायदेशीरपणे लटकत आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण तर होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हे फलक लावले आहेत, तिथूनच नगर परिषदेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांची रोज ये-जा असते. नगराध्यक्षांच्या दालनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या फलकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विद्युत खांबांवर अशा प्रकारे लोखंडी तारा किंवा प्लास्टिकच्या दोऱ्यांनी फलक बांधणे हे धोकादायक आहे. पावसाळ्यात किंवा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे फलक फाटून खाली पडल्यास पादचारी किंवा दुचाकीस्वारांना गंभीर इजा होऊ शकते. तसेच, विद्युत तारांच्या संपर्कात हे फलक आल्यास शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विद्रुपीकरण रोखणार कोण?
पालघर हे जिल्हा मुख्यालय असल्यामुळे येथे जिल्ह्याभरातून नागरिक कामानिमित्त येत असतात. शहराच्या मुख्य मार्गावरील हे दृश्य जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार अशा प्रकारे अनधिकृत फलक लावणे हा गुन्हा आहे. मात्र, कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने जाहिरातदारांचे धाडस वाढले आहे.
नागरिकांची मागणी
नगर परिषद सामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाई करते, मग त्यांच्याच इमारतीबाहेरील मार्गावर अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. हे व अशाप्रकारे शहरात ठीक ठिकाणी असलेले अनधिकृत फलक तातडीने उतरवून संबंधित संस्था किंवा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
