पालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर ठीकठिकाणी तयार झालेले कचरा स्पॉट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी नगरपरिषद आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. घरोघरी जनजागृती, कचरामुक्ती फलक आणि देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करूनही नागरिक उघड्यावर कचरा टाकत असल्याने, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कठोर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर जिल्हा स्वच्छ करण्याचा नारा दिला असला तरी, छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मुख्यालयाचा मार्ग, रेल्वे स्टेशन, माहीम आणि पालघर-मनोर मार्गावर उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या कचऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण अधिक असून यामुळे गुरेढोरे आणि इतर जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पालघर नगरपरिषद क्षेत्रात सध्या १६ घंटागाड्या कार्यरत असून, प्रत्येक गाडीकरिता तीन स्वच्छता कर्मचारी नियुक्त आहेत. याव्यतिरिक्त, रस्ता, भाजीबाजार व इतर उघड्यावरील कचरा उचलण्यासाठी पाच टिपर (मिनी ट्रक) असून, याकरिता २५ कर्मचारी कार्यरत आहेत. घंटागाडी दररोज घरोघरी, चाळीत व गृहसंकुलांमध्ये पाच ते दहा मिनिटे थांबून कचरा संकलित करते, तसेच टिप्परद्वारे रस्त्यावरील कचरा उचलला जातो. मात्र, सकाळी १०-११ वाजेपर्यंत कचरा उचलल्यानंतर सायंकाळपर्यंत परिस्थिती पूर्ववत होऊन पुन्हा कचऱ्याचे ढिगारे तयार होतात. घंटागाडीच्या वेळेत कचरा न देणाऱ्या आणि गाडी गेल्यावर कचरा आणून उघड्यावर फेकणाऱ्या नागरिकांचा यात अधिक समावेश आहे.

कचराकुंड्यांच्या जागी ढीग कायम

स्वच्छ भारत अभियानाच्या सुरुवातीनंतर २०१४ मध्ये रोगराई आणि अयोग्य व्यवस्थापनाला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील मोठ्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या. शासनाचा उद्देश चांगला असूनही, ज्या ठिकाणी पूर्वी कचराकुंड्या होत्या, त्याच ठिकाणी नागरिक बिनधास्तपणे कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे रोगराईचा धोका कायम आहे.

आरोग्य विभागाचे प्रयत्न आणि आवाहन

आरोग्य विभागाकडून सकाळी ७ वाजेपासूनच घंटागाड्या आणि टिप्परद्वारे कचरा संकलित करण्यास सुरुवात होते. पालघर रेल्वे स्थानकाजवळील भाजी बाजाराबाहेरील घाऊक बाजारपेठ संपल्यानंतर होणारा कचरा उचलण्यात अधिक वेळ जातो, तरीही सकाळी लवकर शहर स्वच्छ करण्यावर आरोग्य विभागाचा भर आहे.

नागरिकांना आवाहन

आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की, जर दररोज घंटागाडी येत नसेल, किंवा कोणत्या भागात फिरत नसेल, तर त्या भागातील मुकादम किंवा नगरपरिषदेकडे त्वरित तक्रार करावी.

दंडात्मक कारवाईची प्रक्रिया

आरोग्य विभागाने यापूर्वी अनेकदा जनजागृती केली आहे. आता दंडात्मक कारवाई करताना पहिले समज देण्यावर भर दिला जाणार आहे. कचरा टाकू नये असे फलक लावूनही वारंवार कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून २८० रुपये दंड आकारला जातो. तर दुकानदार त्यांच्या दुकानाबाहेर दूकानातील कचरा टाकताना आढळल्यास १००० रुपये दंड आकारण्यात येतो.

“सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे विशेष मोहीम थांबली आहे. निवडणूक संपल्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच नगरपरिषद क्षेत्रात कचरा स्पॉट बंद करून, त्या भागात नागरिक कचरा टाकणार नाहीत याची तसदी घेतली जाईल. तसे आढळल्यास कायदेशीर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. – भूषण कबाडे, आरोग्य विभाग पालघर नगरपरिषद