पालघर : पालघर नगर परिषद क्षेत्रामधून मेला टँकरद्वारे संकलित केले जाणारे शहरातील विविध भागातील मलमूत्र मोरेकुरणे खारेलपाडा परिसरातील कचराभूमी येथील गटारामध्ये थेट सोडले जात असल्याचे गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. यामुळे खारेलपाडा, गायतारा परिसरात दुर्गंधी पसरली असून हे मलमूत्र युक्त सांडपाणी थेट सातपाटी- मुरबे खाडीमध्ये मिसळले जात असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे पायाभूत सुविधांवर कोट्यावधी रुपयांचा खर्च पालघर नगरपरिषद करीत असताना मलमूत्र व्यवस्थापन करण्यासाठी असणारे प्रक्रिया केंद्र अनेक वर्षांपासून बंद असल्याकडे दुर्लक्षित राहिले आहे.

मोरेकुरण ग्रामपंचायत असणाऱ्या खालील पाडाच्या उत्तरेच्या बाजूला पालघर नगर परिषदेची कचरा भूमी असून त्या परिसरातील कुजणाऱ्या कचऱ्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी असते. यामुळे त्या पट्ट्यात असणाऱ्या माशांवर नियंत्रण करण्यासाठी नगर परिषदेने फवारणी करण्याचे आश्वासन अनेकदा दिले असले तरीही प्रत्यक्षात त्या परिसरात फवारणी होत असल्याचे बधित ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

२९ ऑगस्टच्या दुपारी मलमूत्र वाहून घेऊन जाणारा एक मैला टँकर कचरा भूमीच्या दिशेने गेल्यानंतर गावकऱ्यानी या टँकरचा पाठलाग केल्यानंतर सुमारे दोन हजार लिटर मलमूत्र या टँकर मधून थेट गटारामध्ये सोडले जात असल्याचे दिसून आले. या गटारामधील पाणी थेट कचराभूमी परिसरातून बाहेर पडून खारेलपाडा या मागच्या बाजूला असणाऱ्या गायतारा जवळील ओहोळात मिसळत असल्याचे दिसून आले. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणी योजना कार्यरत नसल्याने ग्रामस्थ कुपनलिकेचे पाणी वापरत असतात. सातत्याने सोडण्यात येणाऱ्या मलमूत्रयुक्त सांडपाण्यामुळे जल स्तोत्र बाधित झाले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पालघर खारेकुरण दरम्यान वाहणारा ओहोळ पुढे सातपाटी (फड) परिसरात सातपाटी मुरबे खाडी मध्ये मिसळत असल्याने नगर परिषदेच्या मैल टँकर ठेकेदाराकडून हे गैरकृत्य गेले काही महिने सातत्याने केले जात असल्याने या खाडीचे पाणी दूषित झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात पालघर नगर परिषदेची संपर्क साधला असता मल गाळ प्रक्रिया प्रकल्प (फीकल स्लज ट्रीटमेंट प्लांट) कचरा भूमीच्या मध्ये दूरवर असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात मैल टँकर पोहोचत नसल्याने असे कृत्य होत घडल्याचे सांगण्यात आले. मुळातच पावसाळ्यात मल मूत्र सांडपाणी चा उचल करू नये अशा सूचना असताना त्याचे उल्लंघन झाल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची तसेच नव्याने मल गाळ प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येईल असे नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी लोकसत्ताला सांगितले.

मलमूत्र सांडपाणी भूगर्भात !

पालघर नगर परिषदेने सन २०१६ मध्ये मल गाळ प्रक्रिया केंद्र उभारले होते. हा प्रकल्प काहीसा उंचीवर उभारून स्वच्छ होणारे सांडपाणी गोळा करून त्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे अपेक्षित असताना हा प्रकल्प काहीशा खोलगट भागांमध्ये उभारण्यात आल्याने तो कार्यरत राहिला नाही. गेल्या काही वर्षांपासून नगरपरिषदेतर्फे ठेका पद्धतीने गोळा करण्यात येणारे मलमूत्र युक्त सांडपाणी याच प्रकल्पाच्या ठिकाणी सोडले जात असली तरी विना प्रक्रिया हे पाणी जमीन मुरते असे निष्पन्न झाले आहे. या केंद्रापासून सुमारे २०० मीटर अंतरावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांचे निवासस्थान व इतर अधिवास असून त्या ठिकाणी असणाऱ्या कुपनलिकेमधील पाणी देखील सातत्याने भूगर्भात मुरणाऱ्या मलमूत्रयुक्त सांडपाण्यामुळे दूषित झाले असल्याची शक्यता आहे. मलमूत्र टँकर द्वारे दिवसाला चार ते पाच फेऱ्या केल्या जात असून त्यामुळे दररोज १० हजार लिटर दूषित पाणी नैसर्गिक ओहोळामध्ये सोडले जात असल्या कडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे.