पालघर: पालघर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी पक्षाचे उमेदवार रिंगणात असून त्यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत. भाजपा व शिवसेना (शिंदे) पक्षांमध्ये प्रमुख लढत असून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून घेतल्या जाणाऱ्या मतांच्या आधारे या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
शिवसेना (शिंदे) पक्षाने माजी नगरसेवक व जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले असताना भाजपाने अधिकतर नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. शहराचा रखडलेला विकास, नवमतदारांची वाढलेली संख्या आणि उमेदवारांमध्ये असलेला तरुण युवा वर्गाची मते कशाप्रकारे विभागली जातात, यावर या निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष आणि ३० नगरसेवक पदांसाठी लढत आहे. एकूण ५५,७२७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सहा तर ३० नगरसेवक पदांसाठी १९ जणांनी माघार घेतल्याने ११५ उमेदवार रिंगणात आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठीच्या प्रमुख लढतीत चार मोठे दावेदार आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षांतून अलीकडेच प्रवेश केलेल्या माजी गटनेते कैलास म्हात्रे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे. चार वेळा उपनगराध्यक्ष राहिलेले शिवसेना (शिंदे) पक्षाचे उत्तम घरत, माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून अर्ज दाखल केला असून उमेदवारीसाठी पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवक प्रीतम राऊत यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी दाखल केली आहे.
भाजपा व शिवसेना (शिंदे) पक्ष सर्व जागांवर निवडणूक लढवीत असून शिवसेना (ठाकरे) गट २६ ठिकाणी व राष्ट्रवादी (शरद पवार) गटातर्फे चार ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातर्फे १३ तर काँग्रेस व मनसेतर्फे देखील काही जागांवर उमेदवार उतरवण्यात आले आहेत. शिवसेनेने अधिकतर परिचित व माजी नगरसेवकांना संधी दिली असून भाजपाने अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने पालघर मधील मतदार बदल घडवणार का हे २ डिसेंबर रोजी मतदानाद्वारे निश्चित करणार आहेत.
मागील आणि सध्याचे राजकारण
सन २०१९ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली होती. थेट नगराध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाच्या डॉ. उज्ज्वला काळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १०७० मताधिक्याने निवडून आल्या होत्या. नगरपरिषदेत मात्र युतीच्या नगरसेवकांचे वर्चस्व होते.
शिवसेनेचे १४, भाजपचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवक निवडून आले होते. बंडखोरी केलेले पाच अपक्ष नगरसेवक नंतर शिवसेनेत सामील झाल्याने शिवसेनेचे बळ १९ वर पोहोचले होते. दरम्यानच्या काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट व झालेले पक्षांतर यामुळे सद्यस्थितीत भाजपशी संलग्न माजी नगरसेवकांची संख्या १३ वर पोहोचली आहे, तर शिवसेना (शिंदे) पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या १२ वर मर्यादित राहिली आहे.
दरम्यानच्या काळात झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीतर्फे भारतीय जनता पक्षाने व विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे) उमेदवाराने पालघर नगरपरिषद क्षेत्रात आघाडी घेतली होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रचारातील प्रमुख मुद्दे
गेल्या कारकिर्दीत सत्तास्थानी असणाऱ्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांकडून झालेले कथित भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे, सांडपाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन आणि अतिक्रमण याकडे झालेले दुर्लक्ष हे निवडणुकीच्या प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले आहेत. आवश्यकता नसताना हाती घेण्यात आलेली विकास कामे आणि त्यातून पैशाचा झालेला अपव्यय, तसेच शहरातील मूलभूत सुविधांचा प्रश्न मतदारांना भेडसावत आहे.
पालघर शहरात रेल्वे स्थानकातून प्रवेश केल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी, मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांचा विळखा, पदपथावरील अतिक्रमण, पार्किंग व्यवस्था नसणे, तसेच इमारतींना परवानगी देताना सांडपाण्याची व्यवस्था नसणे यांसारख्या समस्या आजही कायम आहेत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, शहरासाठी सुसज्ज क्रीडांगण, बाग बगीचा उभारण्याचे प्रयत्नही तुकड्यांमध्ये पडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरातील मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवण्याचे प्रकार घडत असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वेगवेगळ्या वस्तू व रोख रक्कम वाटली जाण्याची शक्यता आहे. यामुळे अतितटीच्या होणाऱ्या तिरंगी, चौरंगी व बहुरंगी लढतीमध्ये मोजके मतदार आपल्याकडे वळवून विजयी खेचून आणण्याची शक्यता प्रमुख पक्षांकडे आहे.
या निवडणुकीत पॅनल निहाय मतदान करण्याऐवजी वैयक्तिक उमेदवारीला प्राधान्य देण्याचे प्रकार देखील घडण्याची शक्यता असून त्यामुळे निवडणुकीतील समीकरणे अखेरच्या टप्प्यात बदलतील अशी शक्यता आहे. शिवाय काँग्रेस व मनसे तर्फे उभ्या करण्यात आलेल्या उमेदवारांकडून घेतल्या जाणाऱ्या मतांचा प्रभाव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांवर पडणार असून विरोधात असणाऱ्या घटकांच्या एकत्रित मतांचा प्रभाव हा शिवसेना (शिंदे) व भाजपा उमेदवारांचे भवितव्य ठरवेल अशी परिस्थिती आहे.
शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा एकाच ठिकाणी झाल्या असून दोन्ही सभांना मिळालेला प्रतिसाद तसेच प्रचार पाहता निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे) आणि महाविकास आघाडी मध्ये मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत.
युवा मतदारांची भूमिका
या निवडणुकीत नगरसेवक पदाकरिता अनेक नवीन चेहरे उभे राहिले आहेत आणि नवमतदारांची आकडेवारी देखील मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे. झेन झी (युवा मतदार) उमेदवारांकरिता कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सन २००९ मध्ये तत्कालीन सत्ताधारकांच्या कारभाराला कंटाळून इतर पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून सत्ता मिळवली होती. त्यामुळे युवावर्गाने आता रस्त्यांच्या प्रश्नांवरून छेडलेले प्रश्न आणि आंदोलने पालघरकरिता निर्णायक ठरून सन २००९ च्या निकालाची पुनरावृत्ती होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी पक्ष कितीही आमिष दाखवत असले तरी, नव युवा मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतात, हेच निवडणुकीचा अंतिम निकाल ठरवेल.
