पालघर : पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १५ प्रभागातील ३० जागांसाठी २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक राजकीय पक्षातून इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षणीय असून निरीक्षक, सुकाणू समिती, तसेच पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात निश्चित होण्याची शक्यता आहे.

सन २०१९ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. उज्ज्वला काळे निवडून आल्या होत्या. मात्र नगरपरिषदेत युतीच्या नगरसेवकांचे एकतर्फी वर्चस्व होते. दरम्यानच्या काळात शिवसेनेत पडलेली फुट तसेच माजी नगरसेवकांचे झालेले पक्षांतर यामुळे प्रामुख्याने ही निवडणूक भाजपा, शिवसेना (शिंदे) तसेच महाविकास आघाडी मध्ये होईल अशी चिन्ह आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी हाती घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेकडून विविध दाखले घेण्याची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू राहिली आहे.

या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची तयारी सुरू केली असून भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काटोळे यांनी काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून गेल्या महिन्यात पक्षांतर केलेले नगर परिषदेचे माजी गटनेते कैलास म्हात्रे इच्छुक असून त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, भाजपाचे जुने व जेष्ठ नेते जयेश आव्हाड तसेच भाजपा ओबीसी सेलमध्ये सक्रिय असणारे प्रशांत पाटील दावेदार आहेत. निरीक्षकांचा अहवाल राज्यस्तरावर पाठवल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या नावावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होईल असे डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसत्ता ला सांगितले. दरम्यान भाजपा मध्ये नवे आणि जुने असा वाद उफाळून आला असून याचा फटका या निवडणुकीत पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पालघरमध्ये दीर्घकाळ उपनगराध्यक्षपद भूषवलेले उत्तम घरत हे शिवसेना (शिंदे) पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते तसेच माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांचे पती केदार काळे व माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत. या इच्छुक उमेदवारांनी समाज माध्यमांवर तसेच शहरात विविध ठिकाणी पोस्टर, बॅनर बाजी करून वातावरण निर्मिती सुरु केली असून यासंदर्भात अंतिम निर्णय पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असे शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून असलम मणियार हे इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील निम्म्या जागांवर उमेदवार उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहील या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

मागील कारकिर्दीत सत्तास्थानी असणाऱ्या महाविकास आघाडीने आगामी निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचे निश्चित केले असून त्यांच्या जोडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, जनता दल, भूमी सेना देखील राहतील असे ठरले आहे. या आघाडीची जागा वाटपासाठी प्राथमिक बोलणी सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून माजी नगरसेवक प्रीतम राऊत, काँग्रेस पक्षातून संगीता धोंडे व रोशन पाटील इच्छुक असल्याची माहिती पुढे आली आहे. महाविकास आघाडीच्या सुकाणू समितीमार्फत नगराध्यक्ष पदाचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.