पालघर : पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद तसेच वाडा नगरपंचायतीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशाची सर्वत्र मोठ्या प्रमाणात उधळण झाल्यानंतर देखील मतदारांनी पालघर वगळता इतर ठिकाणी बदल करण्याच्या दृष्टीने मतदान केल्याचे दिसून आले. सत्तास्थानी असणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला अहंकार रोखण्यास मित्र पक्षाच्या भूमिकेत असणाऱ्या शिवसेनेने यश संपादन केले असून आगामी जिल्हा परिषदेत शिवसेना (शिंदे) पक्षाला भाजपाने कमी लेखू नये असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पालघर नगर परिषदेत २०१९ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. उज्ज्वला काळे विजयी झाल्या होत्या. मात्र अडीच वर्षानंतर स्थैर्य प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पतीने काही महिन्यातच शिवसेनेत प्रवेश घेतला होता. निवडणुकीनंतर पाच अपक्षांच्या पाठिंबासह शिवसेनेकडे असणाऱ्या १९ नगरसेवकांसह भाजपाकडे सात तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन नगरसेवक होते. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटाफुटी नंतर तसेच विविध नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाकडे १३, शिवसेना (शिंदे) पक्षाकडे १२ तर शिवसेना (ठाकरे) कडे तीन सांख्यिक बलाबल होते. २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा कडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. तसेच भाजपाने निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांना आयात केले होते. मात्र या निवडणुकीत त्यांचे संख्याबळ आठ सदस्यांवरच मर्यादित राहिले. तर शिवसेना शिंदे पक्षात जोरदार उभारी घेत नगराध्यक्ष पदासह १९ जागांवर विजय संपादन केला.
डहाणूमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी देखील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरताना जोरदार पूर्व तयारी व मोर्चेबांधणी केली होती. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाच्या १५ नगरसेवकांची संख्या दोन ने वाढली तरीही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. भाजपाचे उमेदवार सात प्रभागात पॅनलनिहाय विजयी झाले होते. मात्र भरत राजपूत यांचा दरारा तसेच त्यांच्या व त्यांच्या पाठीराख्यांमध्ये निर्माण झालेला सत्तेचा अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाने पुढाकार घेत विरोधकांच्या मदतीने डहाणूमध्ये इतिहास घडवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच शिवसेनेचे एकत्रित संख्याबळ गेल्यावेळीच्या तुलनेत समान राहिले.
जव्हार नगरपरिषदेत शिवसेनेच्या एक हाती सत्तेला आव्हान देण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली होती. जव्हार मधील गेल्या कारकीर्दीत झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचार प्रकरण हे निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे पुढे आणण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना ठाकरे पक्षाच्या मदतीने निवडणूक लढवणाऱ्या रश्मिन मनियार यांची अल्पसंख्यांक मतांवर मदार होती. मात्र भाजपाने जव्हार मध्ये मुसंडी मारून विजयश्री खेचून आणला. विशेष म्हणजे गतवेळी एक सदस्य असणारे भाजपाचे या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल १४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर गतप्रसंगी नगराध्यक्ष सह नऊ नगरसेवक पद असणाऱ्या शिवसेना शिंदे पक्षाची जव्हार मध्ये पीछेहाट झाल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येते.
वाडा येथे खासदार डॉ. हेमंत सवरा व शिवसेनेचे उपनेतेपदी असणारे निलेश सांबरे यांच्याकरिता नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठेची लढाई होती. या निवडणुकीत भाजपाने नगरसेवक पद सहा वरून ११ वर वाढवत नगराध्यक्ष पद शिवसेनेकडून खेचून घेतले.
या चार शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची उधळण झाल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी एका मताला किमान तीन ते पाच हजार रुपये तर प्रतिष्ठेच्या ठिकाणी किंवा अतितटीच्या लढतीच्या ठिकाणी १५ ते २५ हजार रुपये अशा दराने पैशाची उधळण झाल्याचे दिसून आले. दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये पैसे उधळण्याची जणू चुरस लागली असल्याचे चित्र दिसून येत असताना महत्त्वाच्या व मोठ्या मतदार संख्येच्या पालघर व डहाणू शहरांमध्ये शिवसेनेने भाजपावर अंकुश ठेवण्यात यश मिळवले.
जिल्हाप्रमुखांची कामगिरी
भाजपाचे सलग दुसऱ्यांदा जिल्हाप्रमुखपदी असणारे भरत राजपूत यांनी डहाणू व पालघर या शहरांकरिता अर्थकारण सांभाळले होते. त्यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेना (शिंदे) पक्षाचे स्थानीय नेते व इतर पक्षीय नेत्यांमध्ये नाराजी होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ओळखून डहाणू नगराध्यक्ष पदासाठी आमने-सामने लढत करण्यासाठी सर्व विरोधकांची एकत्रित मोट बांधलेली व यामध्ये त्यांना यश मिळाले. निवडणूक प्रचाराच्या दरम्यान सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या अहंकारा बद्दलचे वक्तव्य राज्यभर गाजले होते. भाजपाचा अहंकार रोखण्यास शिवसेनेला यश आल्याचे दिसून आले.
याउलट पालघर व डहाणू विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या विषयी देखील अंतर्गत नाराजीचे वातावरण होते. मात्र निवडणुकीच्या काळात त्यांनी उमेदवारांच्या अडीअडचणी वेळीच सोडवून तसेच योग्य प्रकारे नियोजन करून आपली कामगिरी उंचावत दोन्ही ठिकाणी विजयश्री खेचून आणला. त्यामुळे एकीकडे भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील दोन शहरांमध्ये पराभव चाखावा लागला असताना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना विजयाची लॉटरी लागल्याचे दिसून आले.
