पालघर शहराच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेने उमेदवारी देताना अनुभवी व परिचित चेहऱ्यांची केलेली निवड, पक्षातील संघभावना व उमेदवारांना पॅनलनिहाय झालेले सातत्यपूर्ण मतदान हे विजयाचे गमक ठरले आहे. याउलट भाजपाने पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या मंडळींना उमेदवारी दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उद्भवलेली नाराजी तसेच समन्वयाचा अभाव याचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. पालघरची सत्ता शिवसेनेने राखताना सन २०१९ च्या तुलनेत समाधानकारक कामगिरी बजावली असून विरोधकांना एक हाती धूळ चाखली आहे.
पालघर मध्ये शिवसेनेने आपले पूर्वीप्रमाणे वर्चस्व राखले असून भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चार वेळा उपनगराध्यक्ष पद भूषविलेले उत्तम घरत यांनी (शिवसेना शिंदे) भाजपाच्या कैलास म्हात्रे यांचा ५१५३ मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष पदासाठी रेस मध्ये असणारे माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे (४०९२) व माजी नगरसेवक प्रीतम राऊत (३५४७) यांच्यासह अन्य दोन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजपा अशीच रंगत आली होती.
पालघर मध्ये ३० सदस्यांच्या जागांपैकी शिवसेना (शिंदे) पक्षाला १९, भाजपाने आठ तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने तीन जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाने प्रभाग क्रमांक ४, ५, ९, १०, १३, १४ व १५ अशा सात प्रभागांमध्ये पॅनलचा विजय मिळवला असून त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी मोठे मताधिक्य मिळवणे त्यांना शक्य झाले आहे. याउलट भाजपाला प्रभाग क्रमांक दोन व ११ या दोन प्रभागातच पॅनलनिहाय विजय संपादन करता आला. तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ मध्ये पॅनल विजयी ठरले आहे.
पालघरच्या पूर्व पट्ट्यामध्ये भाजपाने शिरकाव करण्याचा प्रयत्न करत शिवसेनेचा गड मोडून काढण्यासाठी चंग बांधला होता. असे एकंदरीत वातावरण दिसत असताना देखील प्रत्यक्षात भाजपाला पूर्वेकडील भागांमध्ये विशेष यश लाभले नसल्याचे दिसून आले आहे. या उलट शिवसेनेने मध्य पालघर तसेच पालघरच्या बाहेरील भागात असणाऱ्या प्रभागांमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन केले असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.
शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताना चार वेळी उपनगराध्यक्ष असलेल्या उत्तम घरत यांना पसंती दिली. त्यांचा कार्यानुभव, लोकांमधली ओळख तसेच विविध भागातील व समाजातील संपर्क व संबंध त्यांना उपयुक्त ठरले. शिवाय शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवारी ठरवताना अनुभव तसेच लोकसंपर्क हे महत्त्वाचे घटक मानून उमेदवारी दिल्याने तसेच निवडणुकीला सामोरे जाताना संघ भावनेने प्रयत्न केल्याने शिवसेनेला सहज विजय संपादन करता आला. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे निश्चित केल्याने त्याचा लाभ देखील शिवसेनेला अनेक ठिकाणी झाल्याचे दिसून आले आहे.
भाजपाने निवडणुकीच्या महिना दीड महिना पूर्वी अनेक इतर पक्षांमधील स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश दिला होता. नगराध्यक्ष पदासह ३० नगरसेवक पदांपैकी तब्बल २५ चेहरे भाजपामध्ये नव्याने दाखल झाले होते. भाजपातील जुन्या मंडळींना डावलले गेल्याने अशा कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी होती. तर जुन्या व नवीन कार्यकर्त्यांमध्ये उफाळून आलेला वादंग क्षमविण्यास भाजपा पदाधिकाऱ्यांना अपयश आले. जुन्या नगरसेवकांपैकी उमेदवारी देण्यात आलेल्या पाच जणांपैकी भाजपाचे फक्त दोन उमेदवार पुन्हा निवडून येऊ शकले. त्यामुळे उर्वरित माजी नगरसेवकांची कामगिरी लोकांमध्ये पोहोचू शकली नाही हे देखील दिसून आले. भाजपामध्ये स्थानीय पातळीवर समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक लहान मोठ्या कारणासाठी, तसेच आर्थिक नियोजनासाठी येथील मंडळींना डहाणू येथील पक्षाच्या अध्यक्षांकडे धाव घेणे गरजेचे पडत होते. निवडणूकीसाठी निधीचे नियोजन करण्यास अकार्यक्षमता असल्याने भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेना ठाकरे पक्षाच्या काही प्रभागांमधील कामगिरी वगळता इतर सर्व पक्षांची कामगिरी सुमार राहिल्याने पालघर मधील सामना हा शिवसेना शिंदे विरुद्ध भाजपा असाच झाल्य
जय पराजयाचे मताधिक्य
नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ९ ब मधून अमोल प्रकाश पाटील (शिवसेना शिंदे) हे सर्वाधिक १२०४ मताधिक्याने विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक ८ ब मधून राहुल प्रकाश पाटील (शिवसेना ठाकरे) हे ११६५ मताधिक्याने विजयी ठरले. प्रभाग ३ अ मध्ये महेश पांडुरंग कोती (शिवसेना शिंदे) पक्षाचे उमेदवार भाजपाच्या मंगेश मधुकर मरले यांच्याविरुद्ध अवघ्या १० मतांनी विजयी ठरले. तर प्रभाग ४ ब मधील शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रीती रमाकांत मोरे यांनी भाजपाच्या माजी नगरसेविका हिंदवी वीरेंद्र पाटील यांचा ७१ मतांनी पराभव केला. प्रभाग १ ब मधील शिवसेना ठाकरे पक्षाचे आरिफ कलाडिया यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे रवींद्र म्हात्रे यांचा ७८ मतांनी पराभव केला.
नगराध्यक्ष, नगरसेवकांचा जय पराजय
माजी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे यांनी नगरपरिषद स्थापनेपासून सलग सहा वेळा विजय संपादन केला आहे. तत्पूर्वी त्या मावळत्या ग्रामपंचायतच्या देखील सदस्य होत्या. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उत्तम घरत हे नगरपरिषद निर्मितीपासून सलग सहा वेळा सलग निवडून आले आहेत. सन २०२५ च्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, मनोहर दांडेकर, प्रियंका प्रवीण पाटील, अंजली परेश पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
नगरसेवक पद भूषवलेले प्रियंका राजेंद्र पाटील, मोना मुन्ना मिश्रा, राजेंद्र आत्माराम पाटील, रईस मोबीन खान, राधा अरविंद मानकामे, अमोल प्रकाश पाटील, भावानंद शांताराम संखे, चंद्रशेखर गोपीनाथ वडे व शिल्पा अमर वाजपेयी हे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. तर कैलास म्हात्रे, प्रीतम राऊत, जावेद लूलानिया, सुरेश दुबळा, बिंदिया दीक्षित, राजेश गायकवाड, हिंदवी पाटील, अलका राजपूत, सुभाष पाटील, गीता पिंपळे, अक्षय संखे, प्रथमेश पिंपळे, अनुजा तरे व रोहिणी अंबुरे यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
४३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या सहा उमेदवारांपैकी चार यांच्यासह इतर ३९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. जप्त झालेल्या अनामत रक्कम उमेदवारांपैकी १३ उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, १२ उमेदवार राष्ट्रवादी (अप), सहा उमेदवार काँग्रेस, दोन उमेदवार भाजपा तसेच एक उमेदवार राष्ट्रवादी (शप) पक्षाचे होते. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सहा तसेच १५ दोन सदस्यीय प्रभागांमध्ये असे १३४ उमेदवार रिंगणात होते.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते
नगराध्यक्ष पदाच्या सहा उमेदवारांना नापसंती दर्शवलेल्या २९४ मतदारांनी नोटा ला पसंती दर्शवली आहे. सहा उमेदवारांपैकी राहुल ठाकरे यांना १६४ मते तर जावेद लुलानिया यांना १५५ मते मिळाली आहेत. त्यामुळे नोटाच्या जवळपास निम्मे मत मिळवण्यात या उमेदवारांना अपयश आले आहे. अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांना देखील मोठ्या प्रमाणात नापसंती दर्शवली असून पालघर नगरपरिषद मध्ये १७८० मते नोटा ला पडली आहेत.
शिवसेनेची सातत्यपूर्ण कामगिरी
पालघर शहरातील १५ प्रभागांपैकी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या उमेदवाराने तब्बल १२ प्रभागांमध्ये मताधिक्य घेतले तर भाजपाला प्रभाग दोन (६९४), प्रभाग क्रमांक सहा (६०७) व प्रभाग क्रमांक सात (६६) आघाडी मिळवता आली. शिवसेनेने प्रभाग एक (३२१), प्रभाग तीन (१११), प्रभाग चार (५७३) प्रभाग पाच (५८२), प्रभाग आठ (८४६), प्रभाग नऊ (८६२), प्रभाग दहा (५८२), प्रभाग अकरा (८५), प्रभाग बारा (१६१), प्रभाग तेरा (५५३), प्रभाग चौदा (१०७७), प्रभाग पंधरा (७६४) असे मताधिक्य मिळवले
